भूमीअभिलेख कडे मोजणीसाठी कर्मचारी नाहीत; तहसीलदार स्थळ पाहणी करत नाहीत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, April 27, 2026

भूमीअभिलेख कडे मोजणीसाठी कर्मचारी नाहीत; तहसीलदार स्थळ पाहणी करत नाहीत

 भूमीअभिलेख कडे मोजणीसाठी कर्मचारी नाहीत; तहसीलदार स्थळ पाहणी करत नाहीत

शेतकऱ्यांच्या शीव आणि पाणंद रस्त्याच्या समस्या सुटता सुटेनात 



अकलूज (कटूसत्य वृत्त):- आपल्या शेतातून रस्ता द्यायला शेतकरी तयार होत नाहीत. रस्ता दिला तर भूमी अभिलेख खात्याकडे रस्ता मोजणी करायला कर्मचारी, अधिकारी नाहीत. स्थळ पाहणी करायला तहसीलदारांकडे वेळ नाही अशा अनंत अडचणीमध्ये गावोगावचे रस्ते धूळ खात पडले आहेत. प्रांत, तहसीलदार, पंचायत समिती, बांधकाम, भूमी अभिलेख यांच्याकडे हेलपाटे करून शेतकरी दमले आहेत. 
रस्त्यांसाठी दररोज मारामाऱ्या होत आहेत. कोर्ट कचेऱ्या होत आहेत. अशा अनेक तक्रारी माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला व माळशिरस तालुक्याच्या शेतकऱ्यांनी शिवरत्न बंगल्यावर नेते व अधिकाऱ्यांपुढे मांडल्या.

जेष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर यांच्या अध्यक्षतेखाली आज पाच तालुक्यातील शीव व पाणंद रस्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अधिकारी व शेतकरी यांची बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला प्रांत अधिकारी, तहसीलदार वगळता बीडीओ, नायब तहसीलदार, बांधकाम अभियंता, महावितरणचे अधिकारी, मदनसिंह मोहिते पाटील, पं. स. सभापती दत्ता मगर, अर्जुनसिंह मोहिते पाटील, नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील, पाच तालुक्यातील स्थानिक नेते मंडळी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

1 कि मी. रत्यासाठी सरकार 15 लाख रुपये खर्च देत आहे. ग्राम सभेच्या ठरावानुसार पाणंद रस्त्याचे प्रस्ताव आम्ही मान्य करतोय. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांचे संमती पत्र लागत नसल्याची माहिती नायब तहसीलदार यांनी दिली. तर भूमी अभिलेख खात्याकडे कर्मचारी अपुरे आहेत. तरीही अर्जंट मोजणीसाठी पैसे भरून घेतात. माणसेच नसतील तर मोजणी करणार कशी असा प्रश्न खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अधिकाऱ्यांना विचारला. नगरपालिका, नगरपरिषद हद्दीतील पाणंद रस्त्याना अनुदान मिळणार नसल्याची बीडीओ दादासाहेब पांढरे यांनी सांगितले. महसूली अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या रस्त्याच्या समस्या वेळेवर सोडवाव्यात. त्यांना हेलपाटे देऊ नयेत. जिथे अडचणी असतील तिथे अधिकाऱ्यांनी समक्ष जावे व रस्त्यांची भांडणे शेतकऱ्यांनी आपापसात समजूतीने मिटवल्यास अनेक समस्या सुटतील. तसेच सर्वांनी एसआयआर मध्ये आपल्या नावाची नोंदणी बीएलओ कडे करावी असे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील म्हणाले.

चौकट -
रस्ते अडवणाऱ्यांवर होणार कारवाई - आ. जानकर
पाणंद रस्ते मुद्दाम अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर सरकार कारवाई करणार आहे. त्यांचे आधारकार्ड पाच वर्षासाठी बंद केले जाणार आहे. आधार कार्ड बंद केल्यानंतर त्यांचे सर्व व्यवहार अडचणीत येतील. म्हणून कोणत्याही शेतकऱ्याने पाणंद रस्ते अडवू नये.

चौकट -
शक्तिपीठ मध्ये एजंटगिरी सुरु - खा. मोहिते पाटील
माढा मतदार संघातून जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गबद्दल अनेकांनी अनेक अफवा उडवायला सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून अनेक एजंट आपला डाव साधू लागलेत. तर अनेकांनी नुकसान भरपाई मिळण्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या शेतात फळ पिके लावण्यास सांगितले आहे. अनेक ठिकाणी अर्धवट माहितीच्या आधारे आंदोलन, मोर्चे सुरु आहेत. 

शेतकऱ्यांनी या एजंटावरती किंवा भुलथापा मारणाऱ्यांवरती विश्वास ठेऊ नये. लवकरच शक्तिपीठ महामार्गबद्दल अधिकारी व शेतकरी यांची बैठक आयोजित करणार आहोत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages