माढा तालुक्यात गारपीट; द्राक्षे-आंबा पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 20, 2026

माढा तालुक्यात गारपीट; द्राक्षे-आंबा पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल

 माढा तालुक्यात गारपीट; द्राक्षे-आंबा पिकांचे मोठे नुकसान, शेतकरी हवालदिल




माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यात गुरुवारी (ता . १९) सायंकाळी झालेल्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विठ्ठलवाडी, उपळाई खुर्द, मोडनिंब यासह अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात गारपिट झाली.

या गारपिटीमुळे द्राक्षे, आंबा यांसारख्या बागवर्गीय पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे.

गुरुवारी सायंकाळी अचानक आलेल्या या हवामान बदलामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. द्राक्षबागांमध्ये द्राक्ष घडाचे‌ नुकसान झाले आहे. आंब्याच्या झाडांवरील मोहोर व लहान फळेही गारपिटीमुळे झडली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असून आगामी हंगामातील उत्पादनावरही परिणाम होणार आहे.

माढा तालुक्यातील अनेक गावांमध्ये गारपिटीची तीव्रता जास्त होती. काही ठिकाणी विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

ग्रामीण भागात उन्हाळ्यात स्त्रिया शेवया, कुरड्या, पापड्या, लोणचं यांसारख्या घरगुती पदार्थांची तयारी करतात. या कामासाठी लागणारे सूर्यप्रकाश, उष्णता आणि हवामानातील स्थिरता अत्यंत महत्त्वाची असते. मात्र अचानक झालेल्या गारपिटीमुळे वातावरण ओलसर झाले असून या पदार्थांच्या वाळवणीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे महिलांच्या मेहनतीवर पाणी फिरले असून घरगुती उद्योगातून मिळणाऱ्या उत्पन्नावरही फटका बसणार आहे.

उन्हाळ्यामुळे त्रस्त नागरिकांना मात्र या गारपिटीने वातावरणात गारवा निर्माण झाल्याने दिलासा मिळाला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages