पंढरपूर येथे १४ व १५ मार्च रोजी दोन दिवसीय जिल्हास्तरीय ग्रंथालय अधिवेशन
पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे — जिल्हा ग्रंथालय अधिकारी हुसे यांचे आवाहन
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील शासनमान्य ग्रंथालयांच्या बळकटीकरणासाठी पंढरपूर येथे १४ व १५ मार्च रोजी दोन दिवसीय जिल्हास्तरीय ग्रंथालय अधिवेशन व ग्रंथमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या अधिवेशनास जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्री. हुसे यांनी केले.
या अधिवेशनाच्या अनुषंगाने आयोजित करण्यात आलेल्या ऑनलाईन गुगल मीट बैठकीत त्यांनी सर्व तालुक्यांतील ग्रंथालय प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना ही माहिती दिली. बैठकीच्या सुरुवातीला श्री. प्रमोद पाटील यांनी प्रास्ताविक करून अधिवेशनाच्या आयोजनामागील उद्दिष्टे व कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली.
यानंतर ग्रंथालय निरीक्षक श्री. संजय ढेरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना ग्रंथालय चळवळीच्या बळकटीकरणासाठी अशा अधिवेशनांचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच जिल्ह्यातील सर्व शासनमान्य ग्रंथालयांनी सक्रिय सहभाग घेतल्यास ग्रंथालय चळवळीला अधिक चालना मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीत पुढे सांगण्यात आले की, प्रत्येक तालुक्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी यांनी आपली उपस्थिती संबंधित तालुक्यातील जबाबदार प्रतिनिधींकडे नोंदवावी. नियोजनबद्ध पद्धतीने सर्वांनी सहभागी झाल्यास अधिवेशन यशस्वी होण्यास मदत होईल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, पंढरपूर येथे होणाऱ्या या दोन दिवसीय अधिवेशनामध्ये ग्रंथालय क्षेत्रातील विविध विषयांवर चर्चा, मार्गदर्शन सत्रे तसेच वाचन संस्कृतीला चालना देणारे उपक्रम आयोजित करण्यात येणार असून जिल्ह्यातील ग्रंथालय पदाधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये या अधिवेशनाबाबत उत्साहाचे वातावरण आहे.
No comments:
Post a Comment