कार्डधारकांना प्रत्येकी ३ लिटर रॉकेल देणार; गॅसटंचाईवर तोडगा शोधण्याचा प्रयत्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून केरोसीन (रॉकेल) वाटप करण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली असून प्रत्येक कार्डधारकाला ३ लिटर रॉकेल देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दर निश्चितीबाबतचा अंतिम निर्णय लवकरच जाहीर होणार असल्याची माहिती पुरवठा विभागाचे राज्य समन्वयक चंद्रकांत डांगे यांनी दिली.
मंगळवारी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये डांगे यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी संवाद साधत रॉकेल वाटपाच्या नियोजनाचा आढावा घेतला. सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संघर्षामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून जिल्ह्यात गॅसटंचाई तीव्र झाली आहे.
सोलापुरातील गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या लांबलचक रांगा लागल्या असून दररोज सुमारे ७० हजार सिलिंडरची मागणी होत असताना केवळ २० हजार सिलिंडर्सचा पुरवठा होत आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या तुटवड्याची तीव्रता लक्षात घेऊन शासनाने पर्यायी उपाय म्हणून रॉकेल वाटपाचा निर्णय घेतला आहे.
शासनाने सर्व प्रकारच्या शिधापत्रिकाधारकांना रॉकेल देण्याची भूमिका घेतली असली, तरी अद्याप अधिकृत आदेश जारी झालेले नाहीत. यासाठी जिल्ह्यातील संभाव्य लाभार्थ्यांची माहिती शासनाने मागवली आहे.
दरम्यान, पुरवठा विभागाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ग्रामीण भागातील सुमारे ३ लाख ९० हजार शिधापत्रिकाधारकांकडे स्टोव्ह उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर भागात मात्र केवळ ५ हजार नागरिकांकडे स्टोव्ह उपलब्ध असल्याची माहिती अन्नधान्य वितरण विभागाने शासनाला सादर केली आहे.
गॅसटंचाई कमी करण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
.png)
No comments:
Post a Comment