श्रीकृष्ण गुरुकुल’च्या वर्धापनदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- कामती बुद्रुक येथील श्रीकृष्ण गुरुकुलच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त शनिवार, २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक प्रा. प्रमोद आवताडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या कार्यक्रमात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे आणि अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार असून कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रमुख उपस्थित राहणार आहेत.
याबाबत अधिक माहिती देताना प्रा. आवताडे यांनी सांगितले की, २०२१ मध्ये मोहोळ तालुक्यातील वाघोलीवाडी येथील माळावर श्रीकृष्ण गुरुकुलची स्थापना करण्यात आली. ग्रामीण भागातील, विशेषतः शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीचे शिक्षण मिळावे हा या संस्थेचा मुख्य उद्देश आहे. पालकांनी दाखवलेल्या विश्वासामुळे या उपक्रमाचा विस्तार होत असून आता गुरुकुलचे तीन संस्थांमध्ये रूपांतर झाले आहे.
कामती बुद्रुक येथील राधा गुरुकुल हे मुलींसाठी निवासी शिक्षण देणारे केंद्र आहे, तर कामती खुर्द (लामालतांडा) येथे एम. बी. चव्हाण गुरुकुल या ज्युनिअर कॉलेजची उभारणी करण्यात आली आहे.
वर्धापन दिनानिमित्त विश्वास पाटील, राज्यसभा खासदार डॉ. ज्योती बाघमारे, माजी आमदार राजन पाटील, प्रगतिशील शेतकरी नेते रामराव भोसले पाटील, मार्गदर्शक जालिंदर लांडे तसेच सरपंच अंजली पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे स्नेहसंमेलनही आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन प्रा. आवताडे यांनी केले आहे. पत्रकार परिषदेस ज्येष्ठ नेते पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष निकम, जिल्हा दूध संघाचे उपाध्यक्ष दीपक माळी, सभापती राहुल जयसिंग आवताडे, प्राचार्य शिनगारे, प्राचार्य कोळी, प्रा. ज्ञानेश्वर शिंदे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment