जवळगाव व हिंगणी मध्यम प्रकल्पांच्या दुरुस्तीला गती
बार्शी (कटूसत्य वृत्त): बार्शी तालुक्यातील शेती व पिण्याच्या पाण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणारे जवळगाव व हिंगणी हे दोन मध्यम प्रकल्प दीर्घकाळ दुरुस्तीअभावी दुर्लक्षित राहिले होते. मात्र आता संबंधित कामांना गती देण्याबाबत सकारात्मक हालचाली सुरू झाल्याची माहिती आमदार दिलीप सोपल यांनी दिली.
जवळगाव व हिंगणी हे दोन्ही प्रकल्प बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सिंचनाचा मुख्य आधार आहेत. तसेच अनेक गावांच्या पिण्याच्या पाण्याची गरजही या प्रकल्पांवर अवलंबून आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यापासून मुख्य कालव्याची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने कालव्यात मोठ्या प्रमाणावर गळती होत आहे. परिणामी पाण्याचा अपव्यय होऊन शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणात पाणी मिळण्यात अडचणी येत आहेत.
दोन्ही प्रकल्पांच्या विशेष दुरुस्तीसाठी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ यांच्या नियामक मंडळाच्या ११० व्या बैठकीत (दि. २८ डिसेंबर २०२३) मान्यता देण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र सिंचन सुधार कार्यक्रम (टक्वड) फेज-२ अंतर्गत राज्यातील १५५ प्रकल्पांमध्येही या दोन्ही प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.
या अनुषंगाने आ. सोपल यांनी दि. ६ फेब्रुवारी २०२५ रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना पत्राद्वारे सविस्तर मागणी सादर केली होती. दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यासाठी अंदाजपत्रक तयार करणे, प्रशासकीय मान्यता देणे व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत शासन स्तरावर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली होती.
या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री विखे-पाटील यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार दिलीप सोपल, आमदार सुभाष देशमुख तसेच आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते. प्रकल्पांची सद्यस्थिती, कालव्यांतील गळती, दुरुस्तीची तातडीची गरज आणि निधीची उपलब्धता यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीनंतर आ. सोपल यांनी सांगितले की, दोन्ही मध्यम प्रकल्पांच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेतले जाणार असून आवश्यक अंदाजपत्रक, प्रशासकीय मान्यता व निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यास शासन स्तरावर गती दिली जाणार आहे. संबंधित विभागाला तातडीने आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment