एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव येथे आपत्ती व्यवस्थापन जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. प्रथम वर्ष अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी आयोजित या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. नवले होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूरचे संचालक शक्तीसागर ढोले उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसचे प्रोजेक्ट हेड डॉ. कौस्तुभ घाटुळे यांच्यासह शुभांगी गवते, रामचंद्र वाघमारे, बजरंग होटकर, सागर धप्पाधुळे आणि पूजा सपकल हे मान्यवर उपस्थित होते. त्यांच्यासोबत जिल्ह्यातील आपदा मित्रांची उपस्थिती होती. त्यांनी प्रात्यक्षिके द्वारे घ्यावयाची काळजी समजावून सांगितले.
हा कार्यक्रम कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाचे समन्वयक सचिन घाडगे यांनी प्रस्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन कु. मानसी जाधव यांनी केले.
प्रमुख पाहुणे शक्तीसागर ढोले यांनी आपत्ती काळात घ्यावयाच्या प्राथमिक खबरदारी, बचावकार्याची पद्धत आणि नागरिकांनी दाखवायची सजगता याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. डॉ. कौस्तुभ घाटुळे यांनी आपत्कालीन वैद्यकीय सेवांचे महत्त्व व तात्काळ प्रतिसाद यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
“आपदा मित्र” संकल्पनेअंतर्गत प्रशिक्षित स्वयंसेवकांची भूमिका किती महत्त्वाची आहे, यावरही त्यांनी प्रकाश टाकला.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. के. एस. पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाबाबत जागरूकता निर्माण होऊन आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

No comments:
Post a Comment