चपळगावात होम मिनिस्टर कार्यक्रम उत्साहात संपन्न
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चपळगाव आणि बावरकवाडी येथील महिलांसाठी आयोजित होम मिनिस्टरचा सोहळा अत्यंत उत्साहात झाला.
चपळगाव जिल्हा परिषद गटाच्या सदस्या शांभवी सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. अवंती अभिजित पाटील व अभिजित पाटील मित्रपरिवारातर्फे या सोहळ्याचे आयोजन झाले. या सोहळ्याचा प्रारंभ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक
अहिल्यादेवी होळकर, माता रमाई, ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन आणि स्व. संतोष दादा पाटील यांच्या प्रतिमांचे पूजनाने झाले.
याप्रसंगी शांभवी कल्याणशेट्टी म्हणाल्या की, अशा उपक्रमांमुळे महिलांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो आणि त्यांना एक वेगळा आत्मविश्वास प्राप्त होतो. पाटील परिवाराने आयोजित केलेला हा सोहळा महिला सक्षमीकरणाचे एक उत्तम उदाहरण आहे. प्रा. रोहित गुरव यांनी आपल्या खुमासदार शैलीत खेळांची मांडणी केली. उखाण्यांची जुगलबंदी आणि विविध कौशल्यावर आधारित खेळांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या स्पर्धेत सरस्वती तिवारी यांनी प्रथम क्रमांक पटकावत मानाची पैठणी साडी व रेफ्रिजरेटर जिंकले. तसेच द्वितीय क्रमांकाचा एल.ई.डी. टी.व्ही. साक्षी जाधव, तृतीय क्रमांकाचा कुलर शीतल जाधव यांसह गॅस शेगडी आणि मिक्सर रेश्मा बाणेगाव व सावित्री सागरे यांनी पटकावले.

No comments:
Post a Comment