अफवांच्या बाजारात सर्वसामान्य गॅसवर.! - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, March 27, 2026

अफवांच्या बाजारात सर्वसामान्य गॅसवर.!

 अफवांच्या बाजारात सर्वसामान्य गॅसवर.!

देशात ६० दिवस इंधन, तर एका महिन्‍याचा LPG पुरवठ्याची व्यवस्था 

काही ठिकाणी 'नो स्टॉक'चे बोर्ड

राज्यातील अनेक भागात पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा





मुंबई (कटूसत्य वृत्त):- इंधन टंचाईच्या भीतीने आधीच गाळण उडालेला सर्वसामान्य नागरीक बाजारातील अफवांमुळे गॅसवर असल्याचे चित्र ठिकठिकाणी दिसू लागले आहे. पश्चिम आशियातील युद्धामुळे भारतात पेट्रोल-डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण होऊन इंधन दरवाढीची अफवा सोशल मीडियावरुन वार्‍यासारखी पसरली.

यानंतर वाहनधारकांनी पेट्रोल पंपावर गर्दी करत पेट्रोल भरुन घेतले.

यामुळे बुधवारी काही पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली. यावर देशात सुमारे ६० दिवसांचा तेलसाठा असून, एका महिन्याच्या एलपीजी पुरवठ्याची व्यवस्था केली आहे, असे केंद्र सरकारने गुरुवारी स्‍पष्‍ट केले. तसेच पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीची कोणतीही कमतरता नसून कुठल्याही अफवांवर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहन केले.

देशभरात पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगांच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर प्रथमच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने कच्चे तेल, इंधन आणि एलपीजीच्या साठ्याचा तपशील जाहीर केला. त्याचबरोबर, सरकारी मालकीच्या तेल विपणन कंपन्यांनीही पेट्रोल, डिझेल किंवा द्रवीकृत पेट्रोलियम वायू (एलपीजी) ची कोणतीही कमतरता नसल्याचे आणि पुरवठा स्थिर असल्याचे सांगितले.

मंत्रालयाने निवेदनात म्हटले की, देशभरातील सर्व पेट्रोल पंपांवर पुरेसा साठा असून ते सामान्यपणे कार्यरत आहेत. पेट्रोल किंवा डिझेलचे रेशनिंग केले जात नाही. विशेषतः लहान शहरांमधील काही पेट्रोल पंपांना इंधन उचलण्यात अडचण येत आहे. यासाठी पेट्रोल पंपांना पूर्वी एका दिवसाऐवजी तीन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी पतपुरवठा (क्रेडिट) वाढवण्याची पावले उचलण्यात आली आहेत.

देशात कुठेही पेट्रोल, डिझेल किंवा एलपीजीची कमतरता नाही. देशातील पेट्रोलियम आणि एलपीजी पुरवठ्याची परिस्थिती पूर्णपणे सुरक्षित आणि नियंत्रणात असल्याचे मंत्रालयाने अधोरेखित केले. इराण युद्धामुळे कच्च्या तेलाच्या अर्ध्या पुरवठ्यात व्यत्यय आला असला तरी, देशाने पुढील ६० दिवसांसाठी इतर ठिकाणाहून पुरेसा कच्च्या तेलाचा पुरवठा सुरक्षित केला आहे.

तसेच, इंधनाच्या टाक्या इष्टतम पातळीवर आहेत आणि त्या दोन महिन्यांची गरज भागवण्यास मदत करू शकतात. देशांतर्गत इंधनाची उपलब्धता संरचनात्मकदृष्ट्या सुनिश्चित केली असून १५० हून अधिक देशांना शुद्ध इंधनाचा पुरवठा सुरू ठेवला आहे. भारताकडे एकूण ७४ दिवसांची कच्च्या तेलाची आणि इंधनाची साठवण क्षमता आहे, असे त्यात म्हटले आहे.

तसेच ८००,००० टन एलपीजीचे कार्गो सुरक्षित करण्यात आले आहेत. एकंदरीत, एका महिन्याच्या पुरवठ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. देशांतर्गत उत्पादन वाढल्याने आणि आयातीची गरज कमी झाल्याने एलपीजीचा पुरवठाही पुरेसा आहे. अनेक देशांकडून अतिरिक्त मालवाहू जहाजे मिळवण्यात आली आहेत, ज्यामुळे इंधनाची उपलब्धता स्थिर राहील याची खात्री झाली आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

अफवा पसरवला जात असल्याने पेट्रोल पंपावर सकाळपासूनच वाहनधारकांनी मोठी गर्दी केल्याची वस्तूस्थिती आहे. राज्यातील विविध शहरांमध्ये पेट्रोल पंपावर वाहनधारकांनी मोठ्या रांगा लावल्या आहेत. पेट्रोल मिळणार नसल्याची भीती त्यांच्या मनात आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, सांगली, सातारा, ठाणे, कल्याण, परभणी, बीड, नांदेड या शहरांमधील पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा बघायला मिळत आहेत. सरकारकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आले की, पेट्रोल आणि डिझेलचा कोणताही तुटवडा नाही. देशात पुरेसा साठा उपलब्ध आहे. फक्त राज्यच नाही तर देशभरातील विविध शहरांमध्ये हीच स्थिती कायम आहे.

पेट्रोल-डिझेल संपल्याच्या अफवेने राजभरात खळबळ उडाली. ठाणे-कल्याण -डोंबिवलीत इंधनासाठी नागरिकांची झुंबड उडाली. अनेक पंपांवर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्याने ‘नो स्टॉक’चे फलक लावण्यात आले. राज्यात गोंधळ आहे, पण मुंबईत शांतता दिसत आहे. मार्बल हिल, देसाई रोड परिसरात पंपांवर शुकशुकाट. यादरम्यानच प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले की, इंधनाचा साठा पुरेसा आहे, नागरिकांनी अफवांना बळी पडू नका.

सोलापुरातील ऑटो एलपीजी गॅस पंप बंद अवस्थेत आहेत. गॅस तुटवड्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शहरातील ऑटो एलपीजी गॅस पंप बंद ठेवण्यात आले. शहरातील प्राईम फ्युएल ऑटो एलपीजी पंप बंद करण्यात आलाय. मागील जवळपास 10 दिवसांपासून एलपीजी गॅस पंप आहे बंद. हा एलपीजी पंप बंद असल्याने ऑटो रिक्षा चालकांचे हाल होत आहेत.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages