नातेपुते पोलीस प्रशासनाकडून मुंगी घाटाची पाहणी
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- चैत्र शुद्ध द्वादशीस सोमवार दिनांक ३० मार्च २०२६ रोजी अनेक मानाच्या कावडी खांद्यावर घेऊन हजारोच्या संख्येने भाविक भक्त कोथळे तालुका माळशिरस येथील अवघड व खडा असणाऱ्या मुंगी घाटातून शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाला जल अभिषेक करण्यासाठी जात असतात. त्या अनुषंगाने अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके, नातेपुते पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, गोपनीय विभागाचे गणेश कापसे तसेच पोलीस कर्मचारी यांनी मुंगी घाटातील पाहणी केली.
चैत्र शुद्ध द्वादशी सोमवार दिनांक ३० मार्च २०२६ रोजी अनेक मानाच्या मोठ्या कावडी मुंगी घाटातून हजारो भाविकांच्या संख्येने शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवास जल अभिषेक करण्यासाठी जातात.या कावडींमध्ये सगळ्यात मोठी मानाची कावड सासवड जिल्हा पुणे येथील असते ती भुत्या तेल्याची. या कावडिला दोन मोठे मोठे रांजण लावलेले असतात. ते वर घेऊन जाणे हे तसे कष्टाचे काम. आणि मग ज्याच्या अभिषेकासाठी हे पाणी न्यायचे त्यालाच मदतीला बोलवतात. आणि हाकही हक्काचे माणूस असावे तशी म्हणजे, हे म्हाद्या, धाव, मला सांभाळ अशी. असा सगळा द्राविडी प्राणायाम करत ही कावड वर नेहण्याचा नयनरम्य सोहळा त्या ठिकाणी पार पडत असतो या कावडी मुंगी घाटात चढवत असताना कोणताही दोर न लावत मानवी साखळीचा साह्याने अवघड आसा मुंगी घाट सर केला जातो. हा सोहळा पाहण्यासाठी मुंगी घाटाच्या पायथ्याशी कोथळे गावात तसेच शिखर शिंगणापूर मुंगी घाटावर लाखोच्या संख्येने भाविक भक्त जमा झालेले असतात. मुंगी घाटाच्या वरील भाग घाटमाथा सपाटी हा शिखर शिंगणापूर हद्दीत येत असून मुंगी घाटातील डोंगराचा पूर्ण भाग हा सोलापूर जिल्हा हद्दीत येतो आहे. त्या अनुषंगाने नातेपुते पोलीस प्रशासनाकडून मुंगी घाटातील पहाणी करून त्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये निसरडा भाग असल्याने घाटातून वर चढत असताना त्या ठिकाणी काय उपाययोजना करता येतील याची पाहणी केली या होणाऱ्या यात्रेसाठी नातेपुते पोलीस प्रशासनाकडून ६ पोलीस अधिकारी ८२ पोलीस अंमलदार ३० होमगार्ड पथकातील कर्मचारी,पोलीस मुख्यालयाकडील १ आरसीपी पथक, तसेच महाराष्ट्र कमांडो फाउंडेशनचे जवान असा बंदोबस्त लावण्यात येणार आसल्याची माहिती नातेपुते पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस अधिकारी विशाल वायकर यांनी दिली. अकलूज उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वाळके यांनी शिखर शिंगणापूर यात्रा बंदोबस्त व कावड यात्रा अनुषंगाने माहिती घेऊन मुंगी घाट येथील तेथील सर्व बाबींची पाहणी करून भाविकांना यात्रा कालावधीत अडचणी येऊ नयेत याकरिता योग्य त्या सूचना देऊन शिखर शिंगणापूर कावड यात्रा अनुषंगाने पुरविण्यात आलेला पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेतला.

No comments:
Post a Comment