Hot Posts

6/recent/ticker-posts

पांडुरंग कारखान्याकडून ऊस बिलाचे २८२ कोटी अदा

 पांडुरंग कारखान्याकडून ऊस बिलाचे २८२ कोटी अदा




श्रीपूर (कटूसत्य वृत्त): गळीत हंगाम २०२५-२६ मध्ये कर्मयोगी सुधाकर पंत  परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखाना  या कारखान्याने गाळप केलेल्या संपूर्ण उसाची बिले प्रतिटन ३ हजार रुपयेप्रमाणे अदा केली आहेत. तसेच कामगारांनाही शासनाच्या वेतनवाढ करारानुसार १० टक्के पगारवाढ डिसेंबर २०२५ पासून लागू करून देण्यात आली आहे.

‘शेतकरी हिताय, कामगार सुखाय’ हा श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक यांचा मूलमंत्र जपत कारखान्याने शेतकरी व कामगार हिताला प्राधान्य दिल्याची माहिती चेअरमन माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी दिली.

प्रशांतराव परिचारक म्हणाले की, कारखान्याने जाहीर केलेल्या दरानुसार प्रतिमेट्रिक टन ३ हजार रुपयेप्रमाणे एकूण २८२ कोटी रुपयांची ऊस बिलाची रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. एफ.आर.पी. २,८५३ रुपये असतानाही त्यापेक्षा जास्त दर देणारा जिल्ह्यातील हा पहिला कारखाना ठरला आहे.

कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पातून आतापर्यंत ६ कोटी युनिट वीज निर्मिती करण्यात आली असून त्यापैकी ३.०४ कोटी युनिट वीज महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड  ला विक्री करण्यात आली आहे. आसवणी (डिस्टिलरी) प्रकल्पातून १.१० कोटी लिटर उत्पादन घेण्यात आले असून दोन्ही प्रकल्प सध्या सुरू आहेत.

ऊस तोडणी व वाहतूक करणाऱ्या ठेकेदारांची बिलेही वेळेवर अदा करण्यात आली आहेत. पुढील गळीत हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी ऑफ-सीझनमधील दुरुस्ती व देखभाल कामांना गती देण्यात आली असून सर्व कामे वेळेपूर्वी पूर्ण करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

११ टक्के साखर उतारा

यंदाचा गळीत हंगाम समाधानकारक ठरला आहे. कारखाना सलग १०२ दिवस विनाखंड सुरू ठेवत ९,४०,२२२ मे.टन उसाचे गाळप करण्यात आले. त्यापासून ८,५२,७९० क्विंटल साखर उत्पादन झाले असून सरासरी साखर उतारा ११ टक्के राहिला आहे.

यावेळी संचालक दिनकरराव मोरे, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, हणमंत कदम, सुदाम मोरे, विजय जाधव, किसन सरवदे, शामराव साळुंखे, सीताराम शिंदे, दाजी पाटील, दिलीप गुरव आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments