सोलापूरात भाजपच्या विरोधात ‘मुंडण आंदोलन’; महापौरपदावरून मराठा समाजाचा तीव्र निषेध - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, February 25, 2026

सोलापूरात भाजपच्या विरोधात ‘मुंडण आंदोलन’; महापौरपदावरून मराठा समाजाचा तीव्र निषेध

 सोलापूरात भाजपच्या विरोधात ‘मुंडण आंदोलन’; महापौरपदावरून मराठा समाजाचा तीव्र निषेध




 


सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- भाजपने सोलापूर महापौरपदावर मराठा समाजाला प्रतिनिधित्व न दिल्याच्या निषेधार्थ शहरात आज ‘मुंडण आंदोलन’ करण्यात आले. “एक मराठा, लाख मराठा”च्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. मराठा क्रांती मोर्चाचे राज्यसमन्वयक रामभैय्या जाधव यांनी स्वतः मुंडण करून आंदोलनाची सुरुवात केली. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आंदोलनकर्त्यांचा आरोप आहे की, १९९३ नंतर तब्बल ३२ वर्षे मराठा समाजाला सोलापूर महापौरपदापासून वंचित ठेवण्यात आले आहे. यंदा तीन दशकांनंतर संधी असतानाही सत्ताधारी पक्षातील भाजपच्या काही खूनशी  स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मराठा समाजाचा महापौर होऊ दिला नाही, असा दावा आंदोलकांनी केला.

आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १९९३ नंतर ३ वेळा पद्मसाली समाज, २ वेळा मुस्लिम समाज, २ वेळा लिंगायत समाज, २ वेळा लमाण समाज, तर ब्राह्मण, कैकाडी आणि धनगर समाजाला प्रत्येकी एकदा संधी या समाजांना महापौरपदाची संधी मिळाली. मात्र, मराठा समाजाला या कालावधीत महापौरपद मिळाले नाही, असा आरोप करण्यात आला. “ही केवळ पदाची मागणी नसून न्यायाची अपेक्षा आहे,” असे जाधव यांनी स्पष्ट केले.

आंदोलनकर्त्यांनी सत्ताधारी पक्षातील भाजपच्या काही स्थानिक नेत्यांवर ‘मराठा समाजावर राजकीय अन्याय’ केल्याचा आरोप केला. मात्र, त्यांनी स्पष्ट केले की हा संघर्ष कोणत्याही व्यक्ती किंवा इतर समाजाविरोधात नसून प्रतिनिधित्वाच्या हक्कासाठी आहे. “प्रत्येक समाज आमचा लहान भाऊ आहे; पण ३२ वर्षे प्रतीक्षा करूनही न्याय न मिळाल्याने आंदोलनाची वेळ आली,” असे मत व्यक्त करण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१६ साली मराठा आरक्षणाचा निर्णय घेतल्यावर तसेच २०२५ मध्ये अण्णासाहेब पाटील महामंडळासाठी निधी जाहीर केल्याबद्दल राज्यात पहिला सत्कार आपणच केला होता, अशी आठवणही आंदोलनकर्त्यांनी करून दिली. त्यामुळे सध्याच्या निर्णयामुळे समाजात अधिक नाराजी निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले.

आंदोलनादरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीचा संदर्भही देण्यात आला. ६८ पैकी अपेक्षित संख्येऐवजी भाजपविरोधात ३० उमेदवार निवडून आल्याचे सांगत, हा निकाल ‘उत्तर’ असल्याचा दावा करण्यात आला. 

“जोपर्यंत मराठा समाजाचा महापौर होत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू राहील,” असा इशारा देण्यात आला. भविष्यात कोणत्याही पक्षाकडून शैक्षणिक, राजकीय, नोकरी किंवा सामाजिक क्षेत्रात अन्याय झाल्यास समाज आवाज उठवत राहील, असेही जाहीर करण्यात आले.

दरम्यान, सत्ताधारी पक्ष किंवा संबंधित पदाधिकाऱ्यांकडून या आरोपांवर अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नसून, शहरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रतिनिधित्वाचा प्रश्न, आरक्षणाची पार्श्वभूमी आणि स्थानिक सत्तासमीकरणे यामुळे सोलापुरातील राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages