पोलीस मुख्यालय भिंतीलगतची अनधिकृत ८० खोके जमीनदोस्त
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहरातील सोलापूर पोलीस मुख्यालयाच्या भिंतीलगत अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले सुमारे ७० ते ८० खोके सोमवारी महापालिकेच्या अतिक्रमण प्रतिबंधक विभागाकडून जमीनदोस्त करण्यात आले.
पहाटेपासून सुरू झालेल्या कारवाईत महापालिका अतिक्रमण प्रतिबंधक विभागाने ही धडक मोहीम राबवित परिसरातील अतिक्रमणांवर मोठा हातोडा मारला. गेल्या काही महिन्यांपासून संबंधित ठिकाणी टपऱ्या व खोके उभारण्यात आले होते. यामुळे वाहतूक कोंडी वाढत होती. यामुळे पोलीस मुख्यालय परिसरातील सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत होता तसेच सार्वजनिक वाहतुकीस अडथळा होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे सातत्याने येत होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेने नियोजनबद्ध पद्धतीने कारवाईचा निर्णय घेतला.
कारवाईदरम्यान अनधिकृत खोके हटवून जागा मोकळी करण्यात आली. महापालिकेकडून संबंधितांना यापूर्वी नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि शासकीय इमारतीलगत असलेली अतिक्रमणे हटविण्यासाठी पुढील काळातही मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
महापालिका आयुक्त डॉ सचिन ओंम्बासे यांच्या आदेशानुसार नियंत्रण अधिकारी तपन डंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. शहरात शिस्तबद्ध आणि अडथळामुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी अतिक्रमणांविरोधातील मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक प्रमुख जगन्नाथ बनसोडे यांनी सांगितले.
कारवाईपूर्वी परिसर केला सील.
सोमवारी पहाटेच महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे पथक, जेसीबी यंत्रणा आणि मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसर सील करत खबरदारी घेतली. काही व्यावसायिकांनी कारवाईला विरोध करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली.
.png)
0 Comments