दादा फाउंडेशनच्या गेट बंद आंदोलनाला यश
दादा फाउंडेशनच्या गेट बंद आंदोलनाला यश
मागण्या मान्य झाल्याने आंदोलन मागे; अन्यथा MSEB कार्यालयावर तीव्र आंदोलनाचा इशारा
मोहोळ (कटूसत्य वृत्त) : दादा फाउंडेशनच्या वतीने आज मोहोळ येथील एमएसीबी (महावितरण) कार्यालयासमोर करण्यात आलेले बेमुदत गेट बंद आंदोलन, प्रशासनाने शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या मान्य केल्यामुळे यशस्वी ठरले. गोफणे डीपीसह इतर डीपी तात्काळ सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याने आंदोलन मागे घेण्यात आले, अशी माहिती दादा फाउंडेशनच्या अध्यक्ष विकास जाधव यांनी दिली.
मौजे लांबोटी (ता. मोहोळ) येथील गोफणे डीपी, खरात डीपी व जाधव डीपी यांची कामे अनेक वेळा पाठपुरावा करूनही पूर्ण न झाल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला होता. यासंदर्भात महावितरण प्रशासनाकडे वारंवार तक्रारी, प्रत्यक्ष भेटी तसेच स्थानिक आमदारांचे पत्र देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
सीना नदीला आलेल्या महापुराला चार महिने उलटून गेले असून, या पुरामध्ये अनेक शेतकऱ्यांचे संसार आणि उभी पिके वाहून गेली. या संकटातून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच, शेतीसाठी अत्यावश्यक असलेली वीजपुरवठ्याची कामे रखडल्याने शेतकरी अडचणीत सापडले होते. उरलेली थोडीफार पिके वाचावीत, यासाठी शेतकरी महावितरण कार्यालयाच्या चकरा मारत होते; मात्र त्यांच्या प्रश्नांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला.
“एसी कार्यालयात बसून शेतकऱ्यांची वेदना समजून घेतली जात नाही. प्रशासनाने वेळेत लक्ष दिले असते, तर डीपीचे काम केव्हाच पूर्ण झाले असते,” अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली होती. यामुळेच गुरुवार, दि. ८ जानेवारी २०२६ रोजी शासकीय वेळेत मोहोळ येथील MSEB कार्यालयावर गेट बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता.
शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात, आंदोलनादरम्यान किंवा त्यानंतर शेतकऱ्यांचे काहीही बरेवाईट झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी महावितरण प्रशासन व शासनावर राहील, असा ठाम इशाराही देण्यात आला होता.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या
मौजे लांबोटी येथील गोफणे डीपी, खरात डीपी व जाधव डीपीस आवश्यक तार, लंग्ज व वायर कनेक्शन करून त्या तात्काळ कार्यान्वित कराव्यात. भगीरथ पाणीपुरवठा योजनेत लांबोटी गावाचा समावेश असला तरी जाधव वस्ती ते जुनी लांबोटी गाव अद्याप जोडलेले नसल्याने हा भाग तात्काळ योजनेत समाविष्ट करून पाणीपुरवठा सुरू करावा.
अखेर दादा फाउंडेशनच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या गेट बंद आंदोलनामुळे महावितरण प्रशासनाने मागण्यांची दखल घेत सकारात्मक निर्णय दिल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. मात्र, दिलेल्या आश्वासनांची तातडीने अंमलबजावणी न झाल्यास आंदोलन पुन्हा तीव्र करण्यात येईल, असा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे.

0 Comments