Hot Posts

6/recent/ticker-posts

निमगावात महापुरुषांना 'रक्तदानातून अभिवादन

 निमगावात महापुरुषांना 'रक्तदानातून अभिवादन




११४ जणांनी केले रक्तदान, महिलांची उपस्थिती लक्षणीय

अकलूज (कटूसत्य वृत्त):- राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त निमगाव येथे सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडले. राजे प्रतिष्ठान आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात 114 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे, या शिबिरात महिलांचा सहभाग लक्षणीय राहिल्याने या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

     सोलापूर येथील मल्लिकार्जुन ब्लड बँक यांच्या सहकार्याने हे शिबिर पार पडले. रक्तदान करण्यापूर्वी वैद्यकीय पथकाद्वारे प्रत्येक दात्याची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये रक्तदाब, वजन आणि हिमोग्लोबिनची तपासणी करून पात्र दात्यांचे रक्तदान घेण्यात आले. सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून हे संकलन करण्यात आले.
राजमाता जिजाऊंच्या जयंतीचे औचित्य असल्याने गावातील महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला. केवळ पुरुषच नव्हे, तर महिलांनीही रक्तदानात हिरीरीने पुढाकार घेतल्याने शिबिराची उंची अधिक वाढली. प्रत्येक रक्तदात्याला आयोजकांच्या वतीने प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाचे उद्घाटन अकलूज येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार यांच्या हस्ते झाले. यावेळी उद्योजक शरद मोरे, संतोष राऊत, लक्ष्मण डोईफोडे, महादेव बंडगर,नागनाथ मगर ,गोरख पवार,रज्जाक मुलाणी, जाफर शेख, माऊली गाडे, ॲड लक्ष्मण मगर, भाऊसाहेब मगर, सचिन कदम यांसह गावातील मान्यवर उपस्थित होते. "तरुणांसोबतच महिलांनीही अशा सामाजिक उपक्रमात पुढे येणे ही अभिमानास्पद बाब आहे," असे गौरवोद्गार मान्यवरांनी काढले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राजे प्रतिष्ठान व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
Reactions

Post a Comment

0 Comments