प्रणिती शिंदेंवर टीका करताना पालकमंत्र्यांचे वादग्रस्त विधान
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील २९ महापालिका निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे भाजप नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा विश्वास कमालीचा वाढला आहे. सोलापूर महापालिकेतही भाजपला चांगले यश मिळाले आहे.
यानंतर आता काँग्रेसच्या खासदाराने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजप मंत्र्यांची जीभ घसरली असून, त्यामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेताना भाजप मंत्री जयकुमार गोरे यांची जीभ घसरली आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात याचे तीव्र पडसाद पाहायला मिळत आहे. आगामी सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये यावरून राजकारण आणखी तापण्याची शक्यता आहे.
महापालिका पराभवानंतर खासदार प्रणिती शिंदे यांनी एक भावनिक पत्र लिहिले होते. या पत्रात त्यांनी “झुकना हमारी फितरत नहीं। दो कदम पीछे हटे हैं…. पर सिर्फ अगली छलांग लगाने” अशी टीका केली होती. या विधानावर जयकुमार गोरे यांनी टीका करताना “दो कदम पिछे नही हटे…..50 कदम निचे गिरे है वह भी टांग उपर” या भाषेत टीका केली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर राजकारण चांगलेच तापले असल्याचे चित्र आहे.
अब की बार सोलापूर जिल्हा परिषदेवर भाजप सरकार असा नारा दिला आहे. जयकुमार गोरे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टीकेमुळे काँग्रेस नेते आक्रमक होण्याची शक्यता आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भाजपकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बैठकांचा सिलसिला सुरू झाला आहे. महापालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही भाजप यश मिळविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

0 Comments