जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने संघटनात्मक तयारीला वेग दिला असून, जिल्ह्यातील सर्व तालुके व मतदारसंघांमधील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती यशस्वीरीत्या पार पडल्या. या मुलाखतींमुळे तळागाळातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून उमेदवारीसाठी मोठी चुरस पाहायला मिळत आहे.
दिनांक १४ जानेवारी रोजी सकाळी अक्कलकोट, दुपारी मंगळवेढा व पंढरपूर, तर सायंकाळी मोहोळ तालुक्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती त्या-त्या तालुक्यांत घेण्यात आल्या. त्यानंतर १५ जानेवारी रोजी दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील उमेदवारांच्या मुलाखती काँग्रेस भवन, सोलापूर येथे पार पडल्या. तसेच १६ जानेवारी रोजी माढा लोकसभा मतदारसंघातील माळशिरस, सांगोला, करमाळा, माढा आणि बार्शी विधानसभा मतदारसंघांतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती संबंधित तालुक्यांमध्ये घेण्यात आल्या.
या मुलाखती खासदार प्रणितीताई शिंदे, सोलापूर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष सातलिंग शटगार, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, प्रदेश चिटणीस सुरेश हावळे, महिला जिल्हा अध्यक्षा डॉ. सुवर्णाताई मलगोंडा तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय प्रमुख पदाधिकारी यांच्या उपस्थितीत पार पडल्या.
मुलाखतीदरम्यान प्रत्येक इच्छुक उमेदवाराची प्रतिमा, सामाजिक कामातील सहभाग, स्थानिक जनसंपर्क, मागील कामगिरी, संघटनात्मक ताकद, पक्षनिष्ठा तसेच संबंधित गट व गणातील सामाजिक समीकरणांचा सखोल आढावा घेण्यात आला. उमेदवारांची जनाधारक्षमता आणि कार्यकर्त्यांशी असलेले संबंध हे महत्त्वाचे निकष मानण्यात आले.
यावेळी मार्गदर्शन करताना खासदार प्रणितीताई शिंदे म्हणाल्या, “जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काँग्रेसचे जास्तीत जास्त सदस्य निवडून आणणे हेच आमचे ध्येय आहे. आले किती, गेले किती यापेक्षा प्रत्येक कार्यकर्त्याने पूर्ण ताकदीने काम करणे महत्त्वाचे आहे. संघटनेची एकजूट आणि कार्यकर्त्यांचा उत्साह हेच काँग्रेसचे खरे बळ आहे. काँग्रेस ही सत्तेसाठी नव्हे, तर शेतकरी आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी लढणारी चळवळ आहे.”
जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार यांनी सांगितले की, इच्छुक उमेदवारांनी मांडलेल्या मागण्या, सूचना व कार्याचा सविस्तर अहवाल पक्षश्रेष्ठींकडे सादर करण्यात येणार असून, अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल. “ज्याला उमेदवारी मिळेल, त्या उमेदवाराच्या पाठीशी संपूर्ण काँग्रेस एकदिलाने उभी राहील. प्रत्येक गट व गणासाठी सक्षम आणि ग्रामीण भागात मजबूत संपर्क असलेले उमेदवार आमच्याकडे उपलब्ध आहेत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
या मुलाखतींच्या माध्यमातून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेसने रणनिती आखत संघटन बळकटीकरणाच्या दिशेने ठोस पावले उचलली असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकावण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
.jpg)
0 Comments