आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश
हंजगी (कटूसत्य वृत्त) :- सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत शिक्षण, आरोग्य व पायाभूत सुविधांच्या माध्यमातून वागदरी जिल्हा परिषद गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी भारतीय जनता पक्ष कटिबद्ध असल्याचे आश्वासन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिले.
वागदरी जिल्हा परिषद गटात काँग्रेस पक्षाला मोठे खिंडार पडले असून आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी ते बोलत होते.
या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, अप्पू बिराजदार यांच्यासह वागदरी गटातील विविध नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच वागदरीचे माजी सरपंच रवी किरण वरनाळे, डॉ. शरण वरनाळे, माजी सरपंच श्रीकांत भैरामडगी, शिवराज मंत्री पोमाजी आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
अल्पसंख्यांक समाजातील नेते इस्त्राईल नदाफ, माजी सरपंच व जिल्हा परिषद सदस्य विजय ढोपरे, शंकर घुगरे, विकास नंजुडे, सिद्धारूढ धड्डे, श्रीशैल पोमाजी, सुभाष शिरगण आदींनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
अक्कलकोट तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा वागदरी जिल्हा परिषद गट काँग्रेससाठी हादरवून टाकणारा ठरला आहे. यापूर्वी अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी काँग्रेसची साथ सोडत धनुष्यबाण हाती घेतल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला होता. आता पुन्हा एकदा वागदरी गटातील काँग्रेसचा गड पूर्णतः ढासळल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
या घडामोडींमुळे वागदरी गटात भाजपाची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
0 Comments