Hot Posts

6/recent/ticker-posts

विज्ञान शिक्षणाला चालना; ग्रामीण भागात प्रयोगशाळेचा लोकार्पण सोहळा

 विज्ञान शिक्षणाला चालना; ग्रामीण भागात प्रयोगशाळेचा लोकार्पण सोहळा



मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शैक्षणिक संपन्नता वाढवण्यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचे प्रतिपादन मोहोळ नागरी सहकारी पतपुरवठा संस्थेचे चेअरमन डॉ. कौशिक गायकवाड यांनी केले. तांबोळे सारख्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान विषयाबाबत असलेली आवड लक्षात घेता त्यांना अद्ययावत सुविधा देणे अत्यावश्यक होते. त्या दृष्टीने उभारण्यात आलेली अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळा निश्चितच प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

तांबोळे (ता. मोहोळ) येथील कर्मवीर रामदास भाऊ कोकाटे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शाळेत अलाईव्हज लाईफ सायन्सेस या संस्थेच्या सीएसआर फंडातून व उर्मी फाऊंडेशन, पुणे यांच्या समन्वयातून लाखो रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक विज्ञान प्रयोगशाळेच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.

या कार्यक्रमास अलाईव्ह लाईफ सायन्सेसचे उपव्यवस्थापक बेलदार, देशभक्त संभाजीराव गरड शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव शैलेश गरड, भीमा कारखान्याचे संचालक संभाजी कोकाटे, समर्थ भवानी महाराज शिक्षण संस्थेचे चेअरमन वैभव गुंड, उर्मी फाऊंडेशनचे मोहोळ समन्वयक प्रज्वल पाटील, अमोल सोंडगे, अशोक कांबळे, कर्मवीर रामदास कोकाटे शिक्षण मंडळाचे सचिव विजय कोकाटे, अण्णासाहेब नागणे, मुख्याध्यापक पी. के. जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षण संस्थेच्या शैक्षणिक वाटचालीबद्दल समाधान व्यक्त करत अलाईव्ह लाईफ सायन्सेस व उर्मी फाऊंडेशन यांच्या या आदर्शवत उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय कोकाटे यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय तळेकर यांनी केले तर आभार बलभीम हांडे यांनी मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments