Hot Posts

6/recent/ticker-posts

मतदानपूर्व तयारीची पाहणी; मुख्य निवडणूक निरीक्षक गुंडे व आयुक्त डॉ. ओम्बासेचा केंद्रांवर दौरा

 मतदानपूर्व तयारीची पाहणी; मुख्य निवडणूक निरीक्षक गुंडे व आयुक्त डॉ. ओम्बासेचा केंद्रांवर दौरा





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या मतदानाच्या अनुषंगाने आज मुख्य निवडणूक निरीक्षक मा. श्रीमती नयना गुंडे तसेच निवडणूक निर्णय अधिकारी तथा आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी शहरातील विविध ठिकाणी भेट देऊन मतदानपूर्व तयारीची सविस्तर पाहणी केली.

या पाहणीदरम्यान एस. आर. फी कॅम्प, मेहता प्रशाला आणि शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी उभारण्यात आलेल्या मतदान यंत्र (ईव्हीएम) वितरण केंद्रांना भेट देण्यात आली. यावेळी स्ट्राँगरूम, निवडणूक साहित्य वितरण प्रक्रिया तसेच सुरक्षाव्यवस्थेची तपासणी करण्यात आली. मतदान प्रक्रिया पारदर्शक, सुरळीत आणि शांततेत पार पडावी यासाठी करण्यात आलेल्या नियोजनाबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेण्यात आली.

उद्या होणाऱ्या मतदानासाठी आज शहरातील सर्व सात निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावरील ठिकाणी मतदान यंत्रांसह आवश्यक निवडणूक साहित्याचे वितरण करण्यात आले आहे. मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांना त्यांच्या मतदान केंद्रांवर वेळेत पोहोचता यावे, यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने बसची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

मतदान प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा सज्ज असून कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, वाहतूक नियोजन तसेच मतदारांसाठी आवश्यक मूलभूत सुविधांची योग्य ती आखणी करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, अशा सूचना मुख्य निवडणूक निरीक्षक व आयुक्तांनी दिल्या.

दरम्यान, सोलापूर शहरातील मतदारांनी कोणत्याही भीतीशिवाय, निर्भयपणे व उत्साहाने मतदान प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. लोकशाहीचा उत्सव असलेल्या या निवडणुकीत मोठ्या संख्येने मतदान होईल, अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments