जिजाऊ ज्ञान मंदिरात ‘आनंद बाजार’ उत्साहात
कोंडी (कटूसत्य वृत्त):- विद्यार्थ्यांमध्ये लहान वयातच उद्योग-व्यवसायाचे कौशल्य, व्यवहारज्ञान आणि स्वावलंबनाची भावना निर्माण व्हावी, या विधायक उद्देशाने जाणता राजा बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, कोंडी संचलित जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलात ‘आनंद बाजार’ या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम विद्यार्थ्यांसह पालक व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यशस्वी ठरला.
या आनंद बाजाराचे उद्घाटन कोंडी गावच्या सरपंच सौ. सुहासिनी निंबाळकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी पालक समितीच्या अध्यक्ष अर्चना गुंड यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात राजमाता-राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सरपंच सुहासिनी निंबाळकर यांनी विद्यार्थ्यांमध्ये व्यवहारज्ञान आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी आयोजित केलेल्या या आनंद बाजाराचे विशेष कौतुक करत सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच जीवनोपयोगी कौशल्ये मिळतात,” असे त्या म्हणाल्या.
फूड फेस्टिवलच्या स्वरूपातील या आनंद बाजारात विद्यार्थ्यांनी सुमारे ७० स्टॉल्स उभारले होते. अवघ्या दोन ते तीन तासांत तब्बल १ लाख ३० हजार २२० रुपयांची उलाढाल झाली. विशेष म्हणजे, सुगंधी दूध आणि थंडगार लस्सीच्या विक्रीला प्रचंड प्रतिसाद मिळाला. यामध्ये दर्जेदार व विक्रमी विक्री करून विद्यार्थी गुरुराज भोसले याने प्रथम क्रमांक पटकावला.
आनंद बाजारात वडापाव, चटकदार भेळ, बटाटा-कांदा भजी, भेळपुरी, पाणीपुरी, सँडविच, मसाला पापड, सुगंधी दूध, शेंगा लाडू, विविध ज्यूस, उसाचा रस, लांबोटी चिवडा, चायनीज पदार्थ, ढोकळा, इडली-सांबर, आईस्क्रीम अशा अनेक पदार्थांना खवय्यांची मोठी गर्दी लाभली.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश नीळ म्हणाले,
“स्वाद आणि संस्कृतीचा उत्सव म्हणून दरवर्षी हा आनंद बाजार घेतला जातो. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय कौशल्य, स्वावलंबन आणि सद्भावना या गुणांचा विकास होतो. आनंद बाजार म्हणजे केवळ मजा नसून, यातूनच व्यवहारज्ञान, उद्योगज्ञान आणि जबाबदारीची जाणीव निर्माण होते.”
यावेळी त्यांनी उद्योगविश्वात कठोर परिश्रमातून यश मिळवलेल्या धीरूभाई अंबानी यांचे उदाहरण देत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.
या उपक्रमात पालक व शिक्षकांनीही उत्साहाने सक्रिय सहभाग घेतला. विशेषतः जिजाऊ ज्ञान मंदिरातील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर विक्री करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आनंद बाजाराचा हा दिवस विद्यार्थ्यांसह सर्वांसाठी एक गोड आणि प्रेरणादायी आठवण ठरला.
कार्यक्रमासाठी विकास जाधव, तुकाराम पाटील, आप्पा भोसले, प्राचार्य सुषमा नीळ, मुख्याध्यापिका अर्चना औरादे यांच्यासह सहशिक्षक वृंद उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब नीळ यांनी केले, तर मुख्याध्यापक वैभव मसलकर यांनी सर्वांचे आभार मानले.
.png)
0 Comments