शंकरनगर येथे अखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी चषक कुस्ती स्पर्धेला रंगत
अकलूज (कटूसत्य वृत्त):- सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील जयंती समारंभ समिती व प्रताप क्रीडा मंडळ शंकरनगर अकलूज यांच्यावतीने शिवतीर्थ आखाङा शंकरनगर अकलूज येथे सुरु असलेल्या ४७ व्या अखिल भारतीय त्रिमूर्ती केसरी चषक कुस्ती स्पर्धा व वजन गट कुस्ती स्पर्धेत रंगत आली असून मल्लांमध्ये सळसळता उत्साह निर्माण झाला आहे.
सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि.१२ ते १४ जानेवारी या कालावधीत स्पर्धेचे आयोजन केले आहे. या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, समितीचे संस्थापक जयसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष मदनसिंह मोहिते पाटील, स्पर्धा प्रमुख सयाजीराजे मोहिते पाटील, मल्ल सम्राट रावसाहेब मगर, बाळासाहेब तरसे, चंद्रकांत मगर,दत्ता मगर,वसंतराव जाधव,पोपट भोसले पाटील, बिभीषण जाधव यांच्यासह विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी,कुस्ती शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेते व आंतरराष्ट्रीय कुस्ती मार्गदर्शक राम सारंग व त्यांचे पंच स्पर्धेसाठी कार्यरत आहेत.
स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या फेरी अखेर खुल्या गटात अनिल जाधव करमाळा यांच्यावर मात करत रविराज चव्हाण पंढरपूर हे विजेते झाले. श्रीधर वावरे सांगली यांनी सचिन जरांगे अकलूज यांच्यावर मात केली. संकेत शिंदे कंदर यांनी अभिजीत सोनवणे कंदर यांच्यावर मात केली. आर्यन पाटील माळशिरस यांनी सचिन काळे आटपाडी यांच्यावर मात केली. मोहसीन गावडे पुळुज यांनी महादेव झंजे माळशिरस यांच्यावर मात केली. अविनाश गावडे सराटी यांनी हनुमंत काळे कंदर यांच्यावर मात केली. सुरज राऊत निमगाव यांनी अर्जुन सावंत काटी यांच्यावर मात केली. अर्जुन सुळ मोरोची यांनी आदित्य कोकाटे अकलूज यांच्यावर मात केली. सोमनाथ कोकाटे पुणे यांनी निलेश यादव खुडूस यांच्यावर मात केली. सागर देवकाते निमगाव यांनी विक्रम भोसले खवसपूर यांच्यावर मात केली. सायंकाळी उशिरापर्यंत वजनी गट व खुल्या गटाच्या कुस्त्या सुरू होत्या.
अखिल भारतीय त्रिमूर्ती कुस्ती स्पर्धेसाठी ८०, तर वजनी २५ ते ८५ पर्यंतच्या गटा करीता ६०३ मल्लांनी सहभाग घेतला आहे.स्वागत वसंतराव जाधव यांनी केले. सूत्रसंचालन युवराज केचे यांनी केले.

0 Comments