अजितदादांच्या अचानक 'एक्झिट' मुळे उमेशदादांचा आधार कोसळला
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनाची वार्ता येताच धाय मोकलून रडले उमेश पाटील
कुरुल (कटूसत्य वृत्त):- गेला आठवडाभरापासून निवडणुकीचे धावपळ परवा उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी कमी अधिक प्रमाणात थांबली... सुरू झाले प्रचाराचे नियोजन... वार बुधवार... दि. २९ नोव्हेंबर... सकाळचा प्रखर सूर्य उगवला... राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या मोहोळ येथील सावली बंगल्यावर कार्यकर्त्यांची वर्दळ सुरु झाली... तालुकाभर प्रचाराचे नियोजन उमेश दादा करत होते... वेळ सकाळी साडेआठची... कुणीतरी कार्यकर्त्यांनी सांगितले अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला आहे... उमेश दादांच्या काळजाचा ठोकाच चुकला... सुरुवातीला काही मिनिटे बातमी खरी की खोटी...? यामध्ये गेले... अपघात झाला खरा, मात्र अजितदादा यामध्ये आहेत की नाहीत हे समजणे कठीण होते... पण, दुर्दैव... आजचा सूर्य उगवला होता आणि तिकडे राजकारणातील तेजस्वी सूर्याचा अंत झाला होता... बातमी उमेश दादांच्या कानावर आदळली आणि अश्रूंचा बांध फुटला... होत्याचं नव्हतं झालं होतं... सगळं संपलं होतं... धायमोकलून रडण्याशिवाय दुसरा पर्यायच उमेश दादांच्या समोर उपलब्ध नव्हता...
पवार कुटुंब आणि उमेश पाटील यांचं एक अतूट नातं. उमेश पाटील यांचा राजकारणातील प्रवेशच पवार कुटुंबीयांच्या छत्रछायेखाली झालेला. अभ्यासू वक्ता, राजकारणातील हजरजबाबीपणा, उत्कृष्ट संघटन कौशल्य, संघटना वाढीसाठी कार्यकर्त्यांना द्यावं लागणार स्पिरिट इतके सगळे असणारे उमेश पाटलांचे गुण ओळखून राष्ट्रवादीच्या युवक प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी उमेश दादांच्या खांद्यावर आली होती. त्यानंतर नरखेड जि.प. सदस्य, पक्षाचा मुख्य प्रवक्ता, वेगवेगळ्या जिल्ह्यांचे प्रभारी अशा अनेक जबाबदाऱ्यांचं ओझं अजित दादांनी उमेश पाटलांच्या खांद्यावर मोठ्या विश्वासाने टाकलं होतं.
दरम्यान, अनगरकर पाटील व नरखेडकर पाटील हे मुख्यतः राष्ट्रवादीचेच दोन प्रवाह. मात्र एका म्यानात दोन तलवारी राहिल्याच नाहीत. अजितदादांनी दोघांनाही नेहमीच बळ दिलं. अशातच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले. कोणत्याही परिस्थितीत अनगरकरांच्या व्यासपीठावर जाणार नसल्याचा निर्णय राष्ट्रवादीच्या मुख्य प्रवक्ता पदाची जबाबदारी असणाऱ्या उमेश पाटलांनी घेतला. यावेळी एका भाषणात अजित पवार यांनी उमेश पाटलांना चांगलंच झापलं होतं. मात्र मोहोळ तालुका आणि मतदारसंघ हा राष्ट्रवादीच्या विचाराचा आहे हे उमेश पाटलांनी राजू खरे यांना निवडून आणून दाखवलं. याचं बक्षीस म्हणून अजित दादांनी पुन्हा एकदा उमेशदादा वर मायेचा पदर धरला आणि जिल्हाध्यक्ष पदाच्या जबाबदारीचा शिवाळ खांद्यावर दिलं.
पवार कुटुंबीय आणि खासकरून अजित दादांसोबत असलेले उमेश दादांचे जिव्हाळ्याचं नातं अनेक प्रसंगावरून अधोरेखित होतं. आज अजितदादांच्या निधनाची वार्ता कानावर पडताच धाय मोकलून रडण्याशिवाय दुसरा कोणताच पर्याय त्यांच्यासमोर नव्हता. दुःखाचं आभाळ उमेश दादांवर कोसळलं होतं. अश्रू ढाळत जिल्ह्यातील आणि राज्यातील अजितदादांवर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांना सावरण्यासाठी ते बळ देत होते. हे धीरगंभीर चित्र बघून कार्यकर्त्यांच्या डोळ्यांच्या कडा आसवांनी ओल्या झाल्या होत्या. मनावरून निसटलेला ताबा सावरत, जड अंतकरणाने हुंदके देत उमेश दादा बारामतीकडे रवाना झाले. राजकारणातील दादा माणसाला कायमचा निरोप देण्यासाठी...!
.png)
.png)
0 Comments