निर्णयांमुळे नाराजी झाली ; पण सर्व काही पक्षहितासाठीच:-पालकमंत्री जयकुमार गोरे
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका निवडणुकीच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्या निर्णयांमुळे अनेकांनी माझ्यावर राग काढला, काहींनी उघडपणे वादही घातले. काहींना पक्षात घेतल्याने नाराजी व्यक्त झाली. मात्र, ते सर्व मोठ्या मनाने स्वीकारून पुढे गेलो. काही वेळा चिडलो, बोललो आणि भांडलोही; पण हे सर्व केवळ पक्षहितासाठीच होते, अशी स्पष्ट कबुली ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली.
सोलापूर महापालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांच्या सत्कार सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार दिलीप माने, शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर, जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांचा सत्कार करण्यात आला.
पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, महापालिका निवडणुकीदरम्यान काही निर्णय सर्वांनाच आवडले नाहीत. त्यामुळे माझ्यावर टीका झाली. मात्र, प्रत्येक निर्णयाची माहिती मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्षांना वेळोवेळी दिली जात होती. अनेक वेळा मतभेद झाले, वादही झाले; पण त्यातूनच सोलापुरात पक्षाला मोठा विजय मिळाला, असे त्यांनी सांगितले.
त्या प्रभागाला १० कोटी रुपयांचा निधी जाहीर
प्रचारादरम्यान सर्वाधिक मताधिक्य मिळवणाऱ्या प्रभागाला १० कोटी रुपये विकासकामांसाठी देण्याचे आश्वासन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले होते. त्या शब्दाची पूर्तता करत त्यांनी सत्कार कार्यक्रमात प्रभाग क्रमांक १२ मधील नगरसेवकांसाठी १० कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. हा निधी दहा दिवसांत उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गौरवोद्गार, मात्र विजयकुमार देशमुख अनुपस्थित
या कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार विजयकुमार देशमुख व आमदार सुभाष देशमुख यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करत गौरवोद्गार काढले. मात्र, कार्यक्रमाला आमदार विजयकुमार देशमुख यांची अनुपस्थिती दिसून आली. त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये रंगली होती.
नगरसेवकांना वरिष्ठांचा कानमंत्र
कार्यक्रमात पक्षाच्या वरिष्ठांनी नवनिर्वाचित नगरसेवकांना काही स्पष्ट सूचना दिल्या. नगरसेवकपद हे लोकांची सेवा करण्यासाठी आहे, वैयक्तिक स्वार्थासाठी नाही. पक्षाला डाग लागेल, असे कोणतेही कृत्य करू नये. शहरातील नागरिकांची कामे प्राधान्याने करावीत, लोकांना वेळ द्यावा. समाजात वावरताना अवास्तव वक्तव्य टाळावे व इतर पक्षांविषयी प्रतिक्रिया देऊ नयेत. वागण्या-बोलण्यामुळे पक्षाची बदनामी होणार नाही, याची काळजी घ्यावी. तसेच मतदार व निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देऊन जनतेची कामे प्रामाणिकपणे करावीत, असा कानमंत्र यावेळी देण्यात आला.
.jpg)
0 Comments