जिल्हा परिषद निवडणुकीत घराणेशाहीला थारा नको : आ. सुभाष देशमुख
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत घराणेशाहीला थारा देऊ नये, असे स्पष्ट मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले आहे. भाजपच्या कोणत्याही नेत्याने आपल्या मुलाला पुढे करू नये, तर पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देऊन त्यांना पुढे आणावे, असे आवाहन त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान केले.
सोमवारी दुपारी सुमारे बारा वाजता आमदार विजयकुमार देशमुख यांनी आमदार सुभाष देशमुख यांची विकासनगर येथील कार्यालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघांमध्ये बराच वेळ विविध विषयांवर चर्चा झाली. या चर्चेनंतर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सध्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असून, आपण या प्रक्रियेत कुठेही सहभागी नसल्याचे त्यांनी सांगितले. पक्षाच्या मंडल अध्यक्ष, तालुकाध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष यांच्या माध्यमातून इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आपण स्वतः मुलाखतीसाठी का गेलो नाहीत, असा प्रश्न विचारला असता आमदार देशमुख म्हणाले की, माजी आमदार दिलीप माने हे कदाचित मुलाखतीसाठी गेले असतील. या वक्तव्यातून त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावत आपली भूमिका ठामपणे मांडली.
जिल्हा परिषद निवडणुकीत कार्यकर्त्यांना संधी मिळावी आणि घराणेशाहीला आळा बसावा, यासाठीच आपण ही भूमिका घेतल्याचे आमदार सुभाष देशमुख यांनी स्पष्ट केले.
.png)
0 Comments