यशाच्या आनंदात मर्यादा ठेवा : आ. सुभाष देशमुख
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महापालिका निवडणुकीतील यश हे कोण्या एका व्यक्तीचे नसून सामुदायिक आहे. हे यश सोलापुरात झालेल्या विकासाचे असून काळ सर्वांना योग्य उत्तर देईल. त्यामुळे यश मिळाल्यानंतर उन्माद करू नये, तर ते पचवायला शिकावे, असे परखड मत आ. सुभाष देशमुख यांनी सोमवारी व्यक्त केले.
महापालिका निवडणुकीतील यशाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांत लागलेल्या अभिनंदन फलकांवर भाष्य करताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. शहरात अनेक ठिकाणी ‘व्यक्ती हरली, पार्टी जिंकली’ अशा आशयाचे फलक लागले आहेत. यासंदर्भात बोलताना आ. देशमुख म्हणाले की, “क्या खाना, तो दम खाना”- या सर्व घडामोडींवर कार्यकर्त्यांची बारकाईने नजर आहे.
ते पुढे म्हणाले की, बाहेरून आलेल्या सुमारे २८ जणांना नगरसेवकपद मिळाले असून, अशा नव्याने आलेल्या नगरसेवकांसाठी अभ्यास वर्ग घेण्याची गरज आहे. आहे त्या अवस्थेत उमेदवारांना पक्षात सामावून घ्या आणि त्यांच्यावर पक्षाचे संस्कार करा, असे पक्षाच्या वरिष्ठांचे स्पष्ट आदेश आहेत.
त्यामुळे नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांसाठी संस्कार व प्रशिक्षण वर्ग घेणे आवश्यक असून, पक्षाची विचारधारा आणि शिस्त त्यांच्यावर बिंबवली पाहिजे, असे मतही आमदार सुभाष देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.
0 Comments