Hot Posts

6/recent/ticker-posts

रस्ते अपघातातील जखमींसाठी दिलासा; कॅशलेस उपचार व ‘राहवीर’ला बक्षीस

 रस्ते अपघातातील जखमींसाठी दिलासा; कॅशलेस उपचार व ‘राहवीर’ला बक्षीस



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- रस्ते अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना आता तातडीचा आणि मोफत वैद्यकीय उपचार मिळणार आहे. केंद्र सरकारच्या *कॅशलेस वैद्यकीय उपचार योजने*अंतर्गत अपघातग्रस्तांना सात दिवसांसाठी दीड लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार दिले जाणार आहेत. तसेच, जखमींना तात्काळ रुग्णालयात पोहोचवणाऱ्या मदतनीसाला (‘राहवीर’) सरकारकडून २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. ही योजना लवकरच राष्ट्रीय स्तरावर लागू करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी तीन टप्प्यांची प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. अपघातानंतर जखमींना तात्काळ केंद्र सरकारने मान्य केलेल्या रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. त्यानंतर २४ तासांच्या आत पोलिसांना अपघाताची सविस्तर माहिती व जखमींची प्रकृती कळवावी लागेल. तिसऱ्या टप्प्यात जखमींची वैद्यकीय फाइल तयार केली जाईल, ज्यामध्ये पोलिस अहवाल आणि ओळखपत्र सादर करावे लागेल. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अपघाताच्या दिवसापासून पुढील सात दिवसांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार मिळणार आहेत.

योजनेअंतर्गत रुग्णालयात दाखल करताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. प्राथमिक उपचार पूर्णपणे मोफत असतील. गंभीर जखमींसाठी शस्त्रक्रिया, एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआयसह सर्व तपासण्या आणि औषधे मोफत देण्यात येणार आहेत.

दरम्यान, अपघात व मृत्यूंची संख्या कमी करण्यासाठी मोटार वाहन कायद्यात ६१ दुरुस्त्या करण्यात आल्या असून, प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आलेल्या योजना यशस्वी ठरल्यामुळे ‘कॅशलेस उपचार’ व ‘राहवीर’ उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सोलापूर ग्रामीण पोलिस दलाच्या वाहतूक शाखेकडून वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यात येत असून, मानवी चुका व नियमांचे उल्लंघन यामुळे अपघातांची संख्या वाढत असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे.

“वाहतूक नियमांचे पालन केल्यास सुमारे ७० टक्के अपघात टाळता येऊ शकतात. शिक्षकांनी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करावी, तसेच ग्रामस्थांनी बैठका घेऊन सुरक्षित वाहनचालना बाबत मार्गदर्शन करावे,” असे आवाहन बाळासाहेब भरणे, पोलिस निरीक्षक (ग्रामीण), सोलापूर यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments