रायबरेली (कटूसत्य वृत्त):- देशातील गरीब व वंचित घटकांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या योजना जाणीवपूर्वक कमकुवत केल्या जात असल्याचा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केला. ‘मनरेगा’सारखी महत्त्वाची योजना दुर्बल करून भांडवलदारांना लाभ दिला जात असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
आपल्या रायबरेली मतदारसंघात पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना राहुल गांधी म्हणाले की, सरकारने ‘मनरेगा’चे नाव बदलून या योजनेचा अपमान केला आहे. या माध्यमातून गरीब, मजूर आणि वंचित घटकांना मिळणारी आर्थिक सुरक्षा हळूहळू हिरावून घेतली जात आहे. हा निर्णय म्हणजे लोकशाहीच्या मुळावर घाला घालणारा असल्याची टीकाही त्यांनी केली.
*‘मनरेगा’ बचावासाठी आंदोलन*
राहुल गांधी पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष संपूर्ण देशात ‘मनरेगा’ बचावासाठी आंदोलन करीत आहे. पक्ष कायम मजूर, गरीब आणि शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी त्यांच्या सोबत उभा आहे. ठरावीक उद्योगपतींच्या हातात देशाची संपत्ती केंद्रित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मजुरांसाठीची असलेली ‘मनरेगा’ योजना दिल्ली, लखनौ किंवा अधिकाऱ्यांच्या कार्यालयातून चालवण्याऐवजी पंचायत पातळीवर प्रभावीपणे राबवली जावी, असे आवाहन राहुल गांधी यांनी यावेळी केले. गरीबांच्या हितासाठी असलेल्या योजनांचे संरक्षण करणे ही लोकशाहीची गरज असल्याचेही त्यांनी ठामपणे नमूद केले.
0 Comments