महापौर, उपमहापौर व विरोधी पक्ष कार्यालय सज्ज
आयुक्त डॉ. ओम्बासे यांची कॉन्सील हॉल व कार्यालयांची पाहणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया नुकतीच यशस्वीरीत्या पार पडली असून नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांसाठी महापौर, उपमहापौर तसेच विरोधी पक्ष नेते व विविध समित्यांच्या कार्यालयांचे नूतनीकरण व सज्जतेचे काम अंतिम टप्यात असून वेळेत काम पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या अनुषंगाने महानगरपालिकेच्या मुख्यालयातील कॉन्सील हॉल, महापौर व उपमहापौर कार्यालय, विरोधी पक्ष कार्यालय तसेच विविध समित्यांच्या कार्यालयांमध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या कामांची आज मा. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाच्या दर्जाबाबत, वेळेत पूर्णत्व, स्वच्छता, प्रकाश व्यवस्था, बैठक व्यवस्था, माहिती तंत्रज्ञान सुविधा तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या बाबींची तपासणी केली.पाहणीदरम्यान मा. आयुक्तांनी संबंधित विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देत सांगितले की, सर्व कार्यालये नागरिकाभिमुख, प्रशासकीय कामकाजास अनुकूल व आधुनिक सुविधांनी सुसज्ज असावीत. कॉन्सील हॉलमध्ये सभासदांसाठी योग्य आसन व्यवस्था, ध्वनी व दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) प्रणाली, वातानुकूलन, स्वच्छता व सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.तसेच नूतनीकरणाचे काम गुणवत्तापूर्ण व ठरलेल्या कालमर्यादेत पूर्ण करून पदग्रहण व आगामी सभांसाठी सर्व कार्यालये सज्ज ठेवावीत, असे निर्देशही मा. आयुक्तांनी दिले. नागरिक व लोकप्रतिनिधींना एकाच ठिकाणी समन्वयाने काम करता यावे, यासाठी कार्यालयीन मांडणी सुयोग्य पद्धतीने करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.या पाहणीमुळे महानगरपालिकेतील प्रशासकीय व लोकप्रतिनिधींचे कामकाज अधिक सुसूत्र, पारदर्शक व कार्यक्षम होण्यास मदत होणार असून, लवकरच महापौर, उपमहापौर, विरोधी पक्ष नेते व विविध समित्यांची कार्यालये पूर्णपणे सज्ज होणार आहेत.
यावेळी नगरसचिव प्रवीण दंतकाळे, नगराअभियंता सारिका अक्कलुवार, कार्यकारी अभियंता विद्युत राजेश परदेशी, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी, सहअभियंता विद्युत महादेव इंगळे, नितीन गायकवाड आदी मान्यवर उपस्थिती होते.
.png)
0 Comments