सोलापूर शहरवासीयांना दर्जेदार सोयी सुविधा देण्यासाठी कटिबद्ध- सुजात आंबेडकर
महाविकास आघाडी अस्तित्वातच नसल्याची केली टीका

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यात महाविकास आघाडी डुबलेली आहे. ती अस्तित्वात नाही. मुंबईसह इतर ठिकाणी एकमेका विरुद्ध लढत आहे. यामुळे महाविकास आघाडी मोठ्या महानगरात अस्तित्वात असल्याचे दिसून येत नाही अशी टीका करतानाच सोलापूर शहरात दलित वस्ती, मुस्लिम मोहल्यात विकास रखडला आहे. सोलापूर शहरवासीयांना दर्जेदार सोयी सुविधा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे, अशी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते
युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सोलापुरातील पत्रकार परिषदेत स्पष्ट केली.
सोलापुरात महापालिका निवडणुकीच्या प्रचार शुभारंभासाठी आले असताना युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आपली राजकीय भूमिका आणि पुढील रणनीती स्पष्ट केली. महाराष्ट्रात महाविकास आघाडी ही अस्तित्वात नाही विविध पाच महानगरपालिकांच्या निवडणुकात ते एकमेकांविरुद्ध लढत आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविरुद्ध आमचा वैचारिक लढा आहे तो चालू राहील. ईव्हीएम मशीन हटावची भूमिका कायम असून त्यासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई सुरूच राहणार आहे. या महापालिका निवडणुकीत महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडीचे अनेक ठिकाणी महापौर होतील. ज्याप्रमाणे नुकत्याच झालेल्या नगरपरिषद नगरपालिकांच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला चांगले यश मिळाले. त्याचप्रमाणे यंदाच्या महापालिका निवडणुकीत निश्चित यश मिळणार आहे. आमचे महत्त्वाचे लक्ष हे जिल्हा परिषदेच्या निवडणुका राहणार असल्याचे सुजात आंबेडकर यांनी सांगितले.
दरम्यान मुंबई महापालिकेत वंचित बहुजन आघाडीने 16 जागा काँग्रेसला परत केल्या असल्या संदर्भात विचारले असता ते पुढे म्हणाले काँग्रेसने हेकेखोरी केली. वंचितला हक्काच्या जागा मिळाल्या नाहीत. यामुळे त्या परत कराव्या लागल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर स्मार्ट सिटी योजना राबविण्यासाठी स्मार्ट लोक मिळाले नाहीत. स्मार्ट सिटी मध्ये आवश्यक साधने उपलब्ध केले पाहिजेत, ते झाले नाहीत. आयटी हब करण्यासाठी शहरातील चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध कराव्या लागतील. त्रुटी पूर्ण कराव्या लागणार आहेत. त्या अनुषंगाने विचार करावा लागणार आहे. दर्जेदार शिक्षण आणि रोजगार यासाठी वंचित बहुजन आघाडी प्रयत्नशील राहणार आहे. सोलापुरातील एमआयडीसीमध्ये नवे उद्योग आणले पाहिजेत. सोलापूर टेक्स्टाईल हब होते त्याला घरघर लागली. त्यानंतर आयटी कंपन्या आल्या नाहीत. त्यामुळे स्थलांतर झाले. सोलापुरात वाईट परिस्थिती झाली आहे. सन 2017 पासून सोलापूर महापालिकेत झालेला भ्रष्टाचार, प्रशासकीय राजवटीत थांबलेली कामे चालू करणे यालाही प्राधान्य देण्यात येणार आहे, असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेस प्रभारी सोमनाथ साळुंखे, डॉ. नितीन ढेपे, शहराध्यक्ष प्रशांत गोणेवार, जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, महेश जाधव, आतिश बनसोडे, विक्रांत गायकवाड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
मनसे युवा नेता हत्येप्रकरणी न्याय मिळाला पाहिजे
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या कारणावरून मनसे युवा नेत्याची हत्या झाली. या संदर्भात बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, भाजपाचे राजकारण हे दबावशाहीचे राहिले आहे. दरम्यान या हत्याप्रकरणी पोलिसांनी निष्पक्ष कारवाई करावी पिढी त्यांना न्याय द्यावा. हत्या हा गंभीर गुन्हा आहे, असे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडीचा चार कलमी अजेंडा राहणार
सोलापूर महापालिका निवडणुकी संदर्भात बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचा अजेंडा हा चार कलमी राहणार आहे. यामध्ये येथील शहरवासीयांना दर्जेदार घरकुल, पाणी, चांगले रस्ते दर्जेदार, मोफत शिक्षण, आरोग्य सेवा आणि रोजगार याला प्राधान्य देण्यात येणार आहे. सोलापुरात दलित वस्ती, मुस्लिम मोहल्यामध्ये विकास रखडला आहे. तिथे कचऱ्यासह विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्या दूर करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे लक्ष राहणार आहे.
0 Comments