मोहोळ (कटूसत्य वृत्त ):- सहा महिन्यांपूर्वी दाखल असलेल्या गुन्ह्यात मोहोळ पोलिसांनी 12 जानेवारी 2026 रोजी भारतीय न्याय संहितेचे संघटीत गुन्हेगारीचे कलम 111 वाढविलेल्या गुन्ह्यांत सोलापूर येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी दोन आरोपींना अटकपूर्व तर अटकेत असलेल्या 7 आरोपींना जामीन मंजूर केला. सतीश अशोक पवार, सुनिल अशोक पवार (रा. वैराग ता. बार्शी) अशी अटकपूर्व तर दानिश लियाकत कुरेशी, मोहम्मद लियाकत कुरेशी, शहाबाज अबूतालीब कुरेशी, तौफिक अबूतालीब कुरेशी, इरफान इकबाल कुरेशी, दस्तगीर कोंडाजी कुरेशी आणि अरबाज अफजल कुरेशी (सर्व रा. मोहोळ ता. मोहोळ) अशी जमीन मंजूर झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,
मोहोळ पोलिसांनी 5 जुलै 2025 रोजी 13 जणांच्या विरोधात गु.र.नं. 744/2025 हा गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल झाला त्यावेळी या गुन्ह्यात सात वर्षा पर्यंत शिक्षा असलेली कलमे लावण्यात आलेली होती. परंतु त्यानंतर मोहोळ पोलिसांनी तब्बल सहा महिन्यांनंतर, 12 जानेवारी 2026 रोजी भारतीय न्याय संहिता संघटित गुन्हेगारीचे कलम 111 वाढवून वरील सात आरोपींना या गुन्हाकामी अटक केली होती.
या प्रकरणात सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात संशयित आरोपी सतीश अशोक कुरेशी व सुनील अशोक कुरेशी यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता. या जामीन अर्जावर सुनावणी वेळी आरोपीचे वकील ॲड. इरफान पाटील यांनी "पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने हे कलम वाढवले असून हे कलम या गुन्ह्याला लागू होत नाही, सदरचा गुन्हा हा संघटित गुन्हेगारीच्या व्याख्येत बसत नाही" असा युक्तिवाद केला व सोबत सर्वोच्च न्यायालयाचे न्यानिवाडे सादर केले. सदरचे ॲड. इरफान पाटील यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोजकुमार शर्मा यांनी शुक्रवारी वरील आरोपींना अटकपूर्व जमिनी मंजूर करण्याचा आदेश केला.
या प्रकरणात आरोपी तर्फे ॲड. इरफान पाटील, ॲड. रियाज शेख सोलापूर, ॲड. दादाराव पवार, ॲड. दत्ता वाघमोडे, ॲड. इमरान पाटील, ॲड. तौफिक सरकाझी, ॲड. सोनल जानराव आदींनी काम पाहिले आहे.
0 Comments