सोलापूरात मोहोळ, सांगोला, कुर्डूवाडी, अकलूज, बार्शी, अक्कलकोटमध्ये EVM मध्ये बिघाड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील 10 नगरपरिषदांसाठी मंगळवारी (ता. 02 डिसेंबर) सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मात्र, पहिल्या तासभरातच मोहोळ, कुर्डुवाडी, सांगोला, अकलूज, बार्शी आणि अक्कलकोट येथील ईव्हीएममध्ये बिघाड झाला, त्यामुळे त्या मशीन बदलून मतदानाची प्रक्रिया पुन्हा सुरळीत सुरू करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील अकरा नगरपरिषदा आणि एक नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झाल्या होत्या. मात्र, मंगळवेढा नगरपरिषद निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे, तर अनगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाल्यात जमा आहे. पण अनगरमधील अपिलावरील सुनावणीचा निकाल वेळेत न आल्याने अनगरमधील निवडणुकीला स्थगिती देण्यात आलेली आहे.
एक नगर परिषद वगळता इतर दहा नगरपरिषदांसाठी सुमारे ४९९ केंद्रावर आज सकाळी साडेसातपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. काही वेळ मतदान झाल्यानंतर मोहोळ आणि कुर्डुवाडीतील प्रत्येकी दोन केंद्रांवरील मशिनला कनेक्शनचा अडथळा निर्माण झाला, त्यामुळे तेथील मशीन बदलून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. काही मतदान केंद्रांवरील मशिनची बटणे दबत नव्हती. त्यामुळे तेथील बॅलेट युनिट बदलण्यात आले.
जिल्ह्यातील अकलूज, अक्कलकोट, बार्शी आणि सांगोला येथील सात मतदान केंद्रांवरील बॅलेट युनिट बदलून दुसरे लावण्यात आले आहेत. काही मतदान यंत्रांची बटण दाबली जात नव्हती. काही मशीनची बटणं आतमध्येच अडकून राहत होती, तर काही मतदान यंत्रांची बटणं दबली जात नव्हती, त्यामुळे मतदारांना मतदान करताना अडचणी येत होत्या.
सांगोला येथील विद्या मंदिर प्रशाला, जिल्हा परिषद शाळा धनगर गल्ली, जिल्हा परिषद शाळा भोपळे रोड या मतदान केंद्रांवरील मशिनची बटणे दबली जात नव्हती, त्यामुळे सांगोल्यातील तीनही मशिन बदलण्यात आलेल्या आहेत.
दरम्यान, 'ईव्हीएम' कंपनीच्या अभियंत्यांच्या सूचनांनुसार तेथील मशीन (बीयू-सीयू) बदलण्यात आले आहे. ज्या ठिकाणी अडचणी आल्या, तेथील मतदान केंद्राध्यक्षांशी त्या दोन अभियंत्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून मार्गदर्शन करण्यात आले आहे, त्यामुळे मतदान यंत्रातील बिघाड या निवडणुकीच्या वेळी बघायला मिळाले.
राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या (एकूण 288) सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला होता. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध अपील असलेल्या प्रकरणांचा निर्णय 23 नोव्हेंबर 2025 रोजी किंवा त्यानंतर आल्याने 24 नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाच्या आणि सदस्यपदांच्या निवडणुकांसाठी मतदान पार पडले. नगरपालिका-नगरपंचायत मतदानाची वेळ संपली तरी देखील राज्यातील अनेक केंद्रांवर मतदारांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या. तर अनेक ठिकाणी राडा झाल्याचे देखील दिसून आले. आता सर्वांचे लक्ष 21 डिसेंबरच्या निकालाकडे लागले आहे.
.png)
.png)
0 Comments