Hot Posts

6/recent/ticker-posts

ओडिशात हरवलेल्या बार्शीच्या आजी स्वगृही परतल्या

 ओडिशात हरवलेल्या बार्शीच्या आजी स्वगृही परतल्या



 

            सांगली (कटूसत्य वृत्त):- मानवी हक्क दिन प्रत्येक व्यक्तीचा सन्मान, सुरक्षितता आणि जगण्याचा अधिकार अधोरेखित करतो. याचे सकारात्मक उदाहरण म्हणजे ओडिशात हरवलेल्या बार्शीच्या आजी झारसगुडाचे जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण आणि सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्यातील संवेदनशील समन्वयामुळे स्वगृही परतल्या. घरापासून, आपल्या माणसांपासून आणि परिचित जगापासून दूर अनोळखी ठिकाणी आजीचा हा एकाकी अनपेक्षित प्रवास ओडिशाहून व्हाया सांगली ते परत बार्शीपर्यंत प्रशासनाच्या सुंदर सहकार्याने परिपूर्ण झाला.

 

कहाणी आहे ७३ वर्षांच्या विजयाबाई रघुनाथ जाधव यांची. विजयाबाई मूळच्या बार्शीच्या. एखाद्या चित्रपटात शोभेल असे वळण आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांच्या जीवनात आले. कुर्डुवाडी येथून हरवलेल्या या आजी परिस्थितीने ओडिशा राज्यातील झारसुगुडा जिल्ह्यातील झारसगुडा येथे ढकलल्या गेल्या. मात्र, डोळ्यांमध्ये आपल्या नातलगांकडे जाण्याची आस लावून बसलेल्या या आजींचा मानवतेवरचा विश्वास प्रशासनाच्या संवेदनशीलतेने आज दृढ झाला आहे. यासाठी त्या वारंवार कृतज्ञता व्यक्त होत्या.

 

विजयाबाई जाधव यांचा बालविवाह झाला होता. त्यांचे पती रघुनाथ जाधव रंगकाम करत. लग्नाच्या काही वर्षानंतर त्यांच्या पतीचे निधन झाले. पदरी दोन मुले व एक मुलगी. साफसफाईची कामे करून त्यांनी मुलांना वाढवले. एका मुलाचा विवाह करून दिला. नातवंडांत रमायचे स्वप्न रंगवणाऱ्या विजयाबाई कामानिमित्त मुलीला भेटायला कुर्डुवाडीला गेल्या होत्या. विचित्र परिस्थितीने त्यांच्या गावापासून हजारो किलोमीटर दूर त्यांना ओडिशा राज्यातील झारसुगुडा जिल्ह्यातील झारसगुडा येथे पोहोचवले. कुटुंबियांनी बार्शी तालुक्यात शोधमोहीम घेतली. पण, यश आले नाही. त्यांच्या विवंचनेत कुटुंबिय हताश झाले होते. विजयाबाई सापडण्याचा आशा धूसर झाल्या.

 

 दरम्यान, ओडिशा राज्यातील झारसुगुडा येथील रेल्वे स्थानकावर विमनस्क अवस्थेत सापडल्यानंतर तिथल्या विकाश या स्वयंसेवी संस्थेने त्यांना आपल्या कुशीत घेतले. विजयाबाई संस्थेच्या वृद्धाश्रमात गेली दोन वर्षे राहिल्या. आपले नाव आणि गावापुरती ओळख असलेली ही अशिक्षित आजी. वृद्धत्व आणि अचानक ओढवलेल्या परिस्थितीमुळे नाव वगळता अन्य अनुषंगिक ओळखही आजीच्या स्मृतीपटलाहून पुसली गेली होती. त्यामुळे तिची स्वतःची अधिक माहितीही तिला सांगता येत नव्हती. ओडिशात पोहोचल्यावर भाषेचाही मोठा अडसर होताच. अशा परिस्थितीत कुटुंबाला भेटायची आस धरून त्या प्रत्येक दिवस कंठत  होत्या.

 

संविधान दिनी संबंधित विकाश या शासननोंदित स्वयंसेवी संस्थेला भेट देण्यासाठी तिथले जिल्हाधिकारी कुणाल चव्हाण (मूळ गाव परभणी) आले होते. योगायोगाने त्यांच्या नजरेस या मराठी भाषक आजी आल्या. चेहऱ्यावर वयाने उमटवलेल्या रेषा आणि डोळ्यांमध्ये आपल्या नातलगांकडे जाण्याची अनंत ओढ. कुणाल चव्हाण यांनी परिस्थिती जाणली. त्यांनी त्यांचे बॅचमेट असलेले सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्याशी तात्काळ संपर्क साधला. दोघांनीही आजीची तिच्या नातेवाईकांशी भेट घडवून आणण्याचा संकल्प केला.

 

आजीचा फोटो व सद्यस्थिती सांगणारा विडिओ मराठी भाषक असल्याने कुणाल चव्हाण यांनी स्वतः बनवला आणि विशाल नरवाडे यांनी पाठवला. सोशल मीडियावरून हा व्हिडीओ आजीच्या लेक वंदना वाघमारेपर्यंत पोहोचला. आई गवसल्याचा आनंदाच्या भरात तिने विशाल नरवाडे यांच्या टीमशी संपर्क साधला. विशाल नरवाडे, कुणाल चव्हाण यांच्या माध्यमातून वंदना वाघमारे व त्यांच्या आई यांच्याशी कॉन्फरन्स कॉलवरून संवाद झाल्यानंतर आजीची ओळख पटली.

 

नातेवाईंकांना भेटण्यासाठीची विजयाबाई जाधव यांची अधीरता पाहून विशाल नरवाडे यांनी स्वखर्चाने तिच्या परतीचा प्रवास सुकर केला. थेट ट्रेन नसल्याने प्रवासातील वेळ वाचवण्यासाठी त्यांनी विकाश संस्थेचे रश्मी रंजन राऊत यांनाच तिला परत घेऊन येण्याची विनंती केली. त्यांनीही संस्थेचे प्रमुख सुशांत बेहेरा, श्रीमती स्मिता साहु यांच्या अनुमतीने तात्काळ होकार दिला. आणि 8 डिसेंबरला परतीचा प्रवास सुरू झाला. झारसगुडा ते छत्तीसगड ते गोंदिया ते महाराष्ट्र एक्स्प्रेसने सांगली असा प्रवास मजल दरमजल करत रश्मी रंजन आणि आजीबाई आज सांगलीत पोहोचल्या. येथून त्यांना त्यांच्या कुटुंबाकडे, बार्शी येथे पाठवण्यात आले. आजी सुखरूप आहेत या भावनेने घरच्यांच्या डोळ्यांत पाणी तर आपल्या कुटुंबाकडे परतण्याच्या भावनेने आजींना हुरूप आला आहे. त्यांच्या काळजीची काजळी दूर झाली आहे.

 

या सर्व घटनाक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) प्रमोद काळे, जिल्हा परिषदेचे कर्मचारी नितीन जाधव, आदिंनी आपला खारीचा वाटा उचलला. दरम्यान सांगलीत आल्यानंतर या आजीचे स्वागत मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी केले. यावेळी त्यांनी या घटनाक्रमाची दखल राज्य मानवी हक्क आयोग, आयोगाच्या सचिव यांनी सकारात्मकतेने घेतल्याचे आवर्जून सांगितले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही दूरध्वनीवरून त्यांची पाठ थोपटली. तसेच, जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या स्वाक्षरीचे व जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने विकाश संस्थेचे प्रतिनिधी रश्मी रंजन यांना यावेळी आभारपत्र प्रदान करण्यात आले.

 

ओडिशापासून सांगलीपर्यंतचा हा प्रवास म्हणजे फक्त अंतराचा नव्हे तर तो माणुसकीचा, सहकार्याचा आणि आशेचा पुल आहे. म्हणूनच सांगलीत परतल्यानंतर विजयाबाई प्रशासनाला वारंवार दुवा देत होत्या. विजयाबाई जाधव यांची ही कहाणी केवळ एका हरवलेल्या माऊलीची नाही; तर ती मानवतेवरचा विश्वास दृढ करणारी, संवेदनशील प्रशासनाचा सुंदर दाखला देणारी आणि जागतिक मानवी हक्क दिनाला अर्थपूर्णता देणारी आहे. 


Reactions

Post a Comment

0 Comments