Hot Posts

6/recent/ticker-posts

पुरुषोत्तम बरडे यांची मुख्य समन्वयक पदावरून मुक्तीची मागणी

 पुरुषोत्तम बरडे यांची मुख्य समन्वयक पदावरून मुक्तीची मागणी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उबाठा) पक्षातील अंतर्गत मतभेद उघडकीस आले असून, सोलापुरातील उद्धव ठाकरे गटाचे नेते पुरुषोत्तम बरडे यांनी निवडणूक समितीचे मुख्य समन्वयक पदावरून मुक्त करण्याची मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे करण्यात आली आहे.
दि. 16 डिसेंबर 2025 रोजी पक्षाच्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिका निवडणूक समितीचे मुख्य समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या तीन दिवसांपासून दिवसरात्र शिवसेना उपनेत्या सौ. अस्मिताताई गायकवाड, जिल्हा प्रमुख गणेश वानकर, संतोष पाटील, महानगर प्रमुख दत्ता माने व महिला जिल्हा संघटक प्रिया बसवंती यांच्या उपस्थितीत बैठका सुरू होत्या. तसेच महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत चर्चा करण्यात येत होती. निवडणुकीसाठी वेळ अत्यंत कमी असल्याने समन्वयावर भर देण्यात येत होता.
मात्र, या प्रक्रियेदरम्यान जिल्हा प्रमुख अजय दासरी यांनी कोणतीही माहिती न देता महाविकास आघाडीच्या बैठकीतून बाहेर पडत, दि. 22 डिसेंबर 2025 रोजी कोणालाही विश्वासात न घेता एकतर्फी पत्रकार परिषद घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी पक्षातील ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे व अनिल कोकीळ यांच्यावर तीव्र टीका केली. तसेच शिवसेना (उबाठा) पक्षाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती स्वतःच्या राहत्या घरी घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
याशिवाय, सोलापूर महानगरपालिका निवडणुकीशी संबंधित सर्व रेकॉर्ड स्वतःकडे असल्याचा दावा केल्यामुळे पक्षात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. अशा प्रकारच्या वागणुकीमुळे पक्षाच्या निवडणूक यशावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर, आपणाकडून देण्यात आलेल्या सोलापूर महानगरपालिका निवडणूक समिती मुख्य समन्वयक पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे, अशी लेखी विनंती पक्षश्रेष्ठींना करण्यात आली आहे. शिवसैनिक म्हणून पक्षाचे आदेश पाळण्यास सदैव तयार आहे,” असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments