आ. देशमुखांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे मतदारसंघातील वाचला पाढा
सांगोला (कटूसत्य वृत्त):- नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब देशमुख यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सांगोला तालुक्याच्या पहिचान असलेल्या उत्कृष्ट प्रतीच्या डाळिंबाची पेटी भेट दिली. सांगोला तालुक्यातील कृषी क्षेत्रातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनाची दखल घेत या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
या भेटीदरम्यान आमदार देशमुख यांनी सांगोला मतदारसंघासमोरील विविध स्थानिक प्रश्नांवर तपशीलवार चर्चा केली. विशेषत: पाणीपुरवठा व सिंचनाच्या सुविधा, दुष्काळी परिस्थितीवर नियंत्रणासाठी उपाययोजना, शेतीसाठी दिवसरात्र वीजपुरवठा, प्रमुख रस्ते दुरुस्ती, तसेच डाळिंब व इतर फलोत्पादनाला बाजारपेठ मिळण्यासाठी राज्यस्तरीय धोरणांची गरज अशा विविध मुद्द्यांवर मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष वेधण्यात आले.
या प्रसंगी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे, दौंडचे आमदार राहुल कुल, विष्णुपंत देशमुख, परमेश्वर कोळेकर व रमेश अनुसे उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगोला मतदारसंघातील सर्व प्रश्न गांभीर्याने ऐकून घेतले. आवश्यक त्या विभागांना तातडीने सूचना देण्याचे आणि प्रलंबित कामांना गती देण्याचे आश्वासन त्यांनी आमदार देशमुख यांना दिले.
सांगोला तालुका हा राज्यातील डाळिंब उत्पादनाचा प्रमुख केंद्र असून, येथील गुणवत्तापूर्ण उत्पादनाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मागणी आहे. ही ओळख जपण्यासाठी आणि शेतकरी बांधवांच्या अडचणी दूर करण्यासाठी शासनाच्या पातळीवर अधिक प्रयत्न करण्याची विनंती या भेटीतून करण्यात आली.
हिवाळी अधिवेशनात सांगोला मतदारसंघासाठी झालेली ही चर्चा फलदायी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
यातील एक नंबर चा फोटो घ्या

0 Comments