Hot Posts

6/recent/ticker-posts

नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला १५ जानेवारीपर्यंत स्थगिती

 नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला १५ जानेवारीपर्यंत स्थगिती





नाशिक (कटूसत्य वृत्त):- नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तपोवन परिसरातील असलेली १८०० झाडे तोडून तेथे साधुग्राम उभारण्याचा प्रस्ताव समोर आल्यानंतर या वृक्षतोडीला जोरदार विरोध केला जात आहे.

नाशिकमधूनच नव्हे, तर राज्यभरातून निसर्गप्रेमी, अभिनेते, नागरिक यांनी या वृक्षतोडीला विरोध दर्शवला आहे. अखेर या विरोधाच्या पार्श्वभूमीवर ही झाडे तोडण्यास राष्ट्रीय हरिद लवादाने काही काळासाठी अंतरिम स्थगिती दिली असल्याचा माहिती याचिकाकर्ते वकिल श्रीराम पिंगळे यांनी केला आहे.

हरित लवादाने दिलेल्या अंतरिम स्थगितीबद्दल माहिती देताना पिंगळे म्हणाले की, “हरित लवादाने अंतरिम आदेश दिला आहे. हा अंतिम निकाल नाही. आम्ही अंतरिम आदेशाची विनंती केली होती, कारण कोणतीही प्रक्रिया न राबवता प्रक्रिया राबवल्याचं दाखवून वृक्षतोडीचा घाट घातला गेला होता. तो मोडीत काढण्याचा आमचा प्रयत्न होता. कायदेशीर प्रक्रिया व्हावी आणि त्यानंतर आवश्यकता असेल तरच वृक्षतोड व्हावी या अपेक्षेने आम्ही हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. पुढच्या सुनावणीची तारीख १५ जानेवारी दिली आहे. तोपर्यंत वृक्षतोडीवर स्थगिती आहे. तोपर्यंत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईल का हा प्रश्न आहे. त्यामुळे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हा अंतरिम आदेश आहे,” असे पिंगळे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होणे म्हणजे काय? याबद्दल विचारले असता वकिल पिंगळे म्हणाले की, “१९७५ चा वृक्ष संवर्धनाच्या कायद्यानुसार वृक्ष अधिकाऱ्याने नोटीस जारी करायला हवी. पण १२ नोव्हेंबरला जारी केलेली नोटीसच बेकायदा आहे. त्यात कोणत्या प्रकारचे किती वृक्ष तोडले जाणार आहेत याची माहितीच दिलेली नाही. ही बाब आम्ही लवादाच्या निदर्शनास आणून दिली आहे. आता ती प्रक्रिया सुरू झाली आहे. पण त्यावरही हजारो लोकांचे आक्षेप आले आहेत. मग हे असताना नेमकं तेथे कशासाठी झाडे तोडणार आहेत, याची कारण मिमांसा त्या ट्री ऑफिसरने करून एक रिजन्ड ऑर्डर पारित करणे अपेक्षित आहे. ती ऑर्डर झाली तर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली म्हणू शकतो,” असे वकिल म्हणाले.

त्या ट्री ऑफिसरच्या आदेशाला देखील त्यांनी जर ओढून ताणून ऑर्डर देण्याचा प्रयत्न केला तरी देखील हरित लवादामध्ये आव्हान देण्यात येईल असेही वकिल पिंगळे म्हणाले.

नाशिकमधील वृक्षतोडीवरून वाद

तपोवनमधील ५४ एकर क्षेत्रात साधुग्रामची उभारणी आणि ३५ एकर क्षेत्रात प्रदर्शनी केंद्राचे (माईस हब) पालिकेचे नियोजन होते. यासाठी चिन्हांकीत १८२५ झाडे तोडणे, पुनर्रोपणाचा विषय समोर आल्यावर तीव्र पडसाद उमटले. कुंभमेळामंत्री महाजन यांनी तपोवनात झाडे तोडून प्रदर्शन केंद्र किंवा तसे व्यावसायिक काम होणार नसल्याचे स्पष्ट केले. साधुग्रामसाठी मागील काही वर्षात वाढलेली लहान झाडे काढून त्यांचे पुनर्रोपण केले जाईल असे त्यांनी म्हटले होते. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, नवीन १५ हजार वृक्षांची लागवड शासन, लोकसहभागातून केली जाईल. यात वड, पिंपळ, जांभूळ अशा अनेक देशी प्रजातीचा समावेश असून १५ फूट वाढ झालेले हे वृक्ष हैदराबाद येथून मागविले जात आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments