मोहोळ बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड.देशपांडेंची निवड
मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ बार असोसिएशनच्या नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी ॲड. अमोल देशपांडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. याचबरोबर उपाध्यक्षपदी ॲड. विनोद धावणे, सचिवपदी ॲड. सुनील प्रक्षाळे, खजिनदारपदी ॲड. मनोज भालेराव तसेच ग्रंथपालपदी ॲड. प्रेमनाथ सोनवणे यांची निवड झाली आहे.
मोहोळ न्यायालय परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. बार असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी नव्या कार्यकारिणीवर विश्वास टाकत एकमताने नेतृत्वाची जबाबदारी सोपवली आहे. नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार ज्येष्ठ वकिलांच्या हस्ते करण्यात आला.
अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ॲड. अमोल देशपांडे यांनी बोलताना सांगितले की, वकिलांच्या समस्या सोडवण्यासाठी, न्यायालयीन कामकाज अधिक सक्षम करण्यासाठी तसेच तरुण वकिलांना मार्गदर्शन मिळावे यासाठी बार असोसिएशनच्या माध्यमातून भरीव कार्य केले जाईल. सर्व सदस्यांना सोबत घेऊन संघटनेची उंची वाढवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
नवनिर्वाचित उपाध्यक्ष, सचिव, खजिनदार व ग्रंथपाल यांनीही बार असोसिएशनच्या हितासाठी प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही दिली. या निवडीबद्दल मोहोळ तालुक्यातील वकील बांधव, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
मोहोळ बार असोसिएशनच्या नव्या कार्यकारिणीकडून वकिलांच्या न्यायहक्कांसाठी तसेच न्यायव्यवस्थेच्या मजबुतीसाठी सकारात्मक आणि प्रभावी कामगिरी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

0 Comments