शेतकऱ्याच्या हत्येचा कट उघड;१० ते १२ लाखांची सुपारी, तीन बंदुका जप्तीच्या मार्गावर
ऑडिओ रेकॉर्डिंग व तोंडी कबुलीने थरारक डावाचा पर्दाफाश
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):-
टेंभुर्णीपासून जवळच असलेल्या टाकळी (टें), ता. माढा (जि. सोलापूर) येथिल तालुक्यात खळबळ उडवणारा गंभीर प्रकार समोर आला असून, टाकळी (टें) येथील शेतकरी सत्यवान रावसाहेब जरक (वय ३८) यांच्या हत्येसाठी १० ते १२ लाख रुपयांची सुपारी देऊन कट रचण्यात आल्याचा धक्कादायक आरोप उघडकीस आला आहे. या कटासाठी तीन बंदुका मिळवण्यात आल्याची माहिती असून, आरोपींनी ऐकवलेली ऑडिओ रेकॉर्डिंग व दिलेली तोंडी कबुली यामुळे हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी टेंभूर्णी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टेंभुर्णी पोलीसांकडून सविस्तर मिळालेली माहिती अशी की
फिर्यादी सत्यवान जरक (रा. टाकळी टें) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिवाळीपासून ते २२ डिसेंबर २०२५ या कालावधीत वेळोवेळी त्यांची हत्या करण्याचा कट रचण्यात आला. आरोपींनी खून केल्यास मोठी रक्कम मिळणार असल्याचे संभाषणात सांगितले होते. खून करण्यासाठी तीन बंदुका आणण्यात आल्याचेही रेकॉर्डिंगमध्ये स्पष्ट होत असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.
या प्रकरणात पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वैभव विलास केसरे, वय २६, व्यवसाय ड्रायव्हर, रा.टाकळी (टें), वशिष्ठ कुंडलिक जाधव, वय ४९, व्यवसाय शेती, रा. टाकळी टें, प्रतापसिंह बिभिशण चंदनकर, वय ४७, मूळ रा.पटवर्धन कुरोली, ता.पंढरपूर; सध्या रा.आलेगाव बुद्धक, ता.माढा
फिर्यादीने नमूद केल्यानुसार, आरोपी वशिष्ठ जाधव व वैभव केसरे यांनी दिलेल्या तोंडी कबुली आणि ऐकवलेल्या रेकॉर्डिंगवरून आपला जीव धोक्यात असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांनी तातडीने टेंभूर्णी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे या घटनेची माहिती उशिरा दिल्याने
रात्री उशिरा टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे
सदर तक्रार दि.२२ डिसेंबर २०२५ रोजी रात्री ११.०२ वाजता नोंदविण्यात आली. तक्रार नोंदविण्याचे काम पोहेकॉ आरकिले यांनी केले. टेंभूर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वाती सुरवसे पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांचा सखोल तपास सुरू
या प्रकरणात ऑडिओ रेकॉर्डिंगची तांत्रिक पडताळणी, बंदुकांचा स्रोत, तसेच आर्थिक व्यवहारांचा मागोवा घेण्याचे काम सुरू आहे. या कटामागे आणखी कोणी सहभागी आहेत का, याचाही शोध घेतला जात असल्याचे टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले
0 Comments