गटविकास सेवा अधिकाऱ्यांचे सामूहिक रजा आंदोलन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- वर्धा जिल्ह्यातील आर्वी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांच्या अटकेच्या निषेधार्थ महाराष्ट्र विकास सेवा संघटनेतर्फे जिल्ह्यातील पंचायत समिती व जिल्हा परिषद मुख्यालयातील अधिकारी ४ ते ६ डिसेंबरदरम्यान सामूहिक रजा आंदोलन करत आहेत. या आंदोलनात गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्यासह परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही सहभाग असणार आहे.
या संदर्भात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांना बुधवारी निवेदन देण्यात आले. शासनाने सोमवार, ९ डिसेंबरपर्यंत सकारात्मक भूमिका घेतली नाही तर महाराष्ट्र विकास सेवेतील सर्व अधिकारी तीव्र आंदोलनाला उतरतील, असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांच्या सामूहिक रजा आंदोलनामुळे जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांचे नियमित कामकाज आजपासून ठप्प होणार असून, अनेक विभागांचे दैनंदिन व्यवहार प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
निवेदन देताना अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रकांत जगताप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, गटविकास अधिकारी रघुनाथ पांढरे, विवेक जमदाडे, अमोल जाधव, शंकर कवितके, अमित कदम, उमेश कुलकर्णी, राजाराम भोग, मनोज राऊत, महेश सुळे, जस्मिन शेख आदी उपस्थित होते.
आरोपानुसार, वर्ध्यातील आर्वी पंचायत समितीत मनरेगा योजनेत झालेल्या कथित अपहारप्रकरणी केवळ एका कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या साक्षीवरून गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे यांना २ डिसेंबर रोजी रात्री उशिरा अटक करण्यात आली. प्राथमिक किंवा प्रशासकीय चौकशी न करता तसेच महिला अधिकारी असल्याने आवश्यक असलेली कायदेशीर प्रक्रिया न पाळता अटक करण्यात आल्याचा आरोप आंदोलक अधिकाऱ्यांनी केला आहे.
.png)
0 Comments