अक्कलकोट व मैंदर्गीतील नूतन लोकप्रतिनिधींचा भव्य सत्कार सोहळा
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील अक्कलकोट व मैंदर्गी नगरपरिषदेतून निवडून आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा भव्य सत्कार सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.
यावेळी अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचेही पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष अभिनंदन केले. जनतेने दिलेल्या भरघोस पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, अक्कलकोट व मैंदर्गी शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी व्यक्त केला.
सत्कारप्रसंगी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांना शुभेच्छा देत सांगितले की, “जनतेने दिलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. अक्कलकोट व मैंदर्गी शहरांच्या विकासासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल.”
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनीही आपल्या भाषणात शहराच्या पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, शिक्षण व आरोग्य या क्षेत्रांमध्ये विकासाभिमुख निर्णय घेण्यावर भर देण्याचे आवाहन केले. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जनतेच्या अपेक्षा पूर्ण केल्या जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात आमदार देवेंद्र कोठे, भाजप शहराध्यक्ष रोहिणीताई तडवळकर, प्रदीप पाटील, शिवशरण जोजन, प्रविण शहा यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने अक्कलकोट व मैंदर्गी शहरात जनहितकारी, विकासाभिमुख आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा संकल्प सर्वांनी एकत्रितपणे केला. हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

0 Comments