Hot Posts

6/recent/ticker-posts

शिवसेनेची बदनामी व महायुतीत बिघाड करणाऱ्या चरण चवरे यांची तात्काळ हकालपट्टी करा

शिवसेनेची बदनामी व महायुतीत बिघाड करणाऱ्या चरण चवरे यांची तात्काळ हकालपट्टी करा





 माजी तालुका प्रमुख प्रशांत बापू भोसले यांची मागणी

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- शिवसेना (शिंदे) पक्षाची प्रतिमा मलीन करणारे, पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्याशी असलेल्या संबंधांचा गैरवापर करून भ्रष्टाचार करत कोट्यवधी रुपयांची माया जमवणारे तसेच मागील विधानसभा निवडणुकीत स्वार्थासाठी महायुतीच्या उमेदवारांच्या विरोधात काम करणारे जिल्हा प्रमुख चरण चवरे यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी ठाम मागणी शिवसेना (शिंदे) चे माजी मोहोळ तालुका प्रमुख प्रशांत बापू भोसले यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना भोसले यांनी स्पष्ट केले की, “चरण चवरे यांची हकालपट्टी होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. यासाठी सोलापूर जिल्ह्यातील जुने-नवे सर्व शिवसैनिकांचे शिष्टमंडळ घेऊन लवकरच शिवसेना पक्षप्रमुख उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, मंत्री ना. शंभूराज देसाई, ना. उदय सामंत आणि आमदार भरतसेठ गोगावले यांची भेट घेणार आहोत.”

शिवसेनेत फूट पडल्यानंतर आम्ही सर्वजण निष्ठेने ना. एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहिलो, असे सांगत भोसले म्हणाले, “मी मोहोळ तालुका प्रमुख असताना शिवसेना वाढवण्यासाठी अनेक गावांत प्रामाणिक प्रयत्न केले. मात्र हे चरण चवरे यांना खटकले. त्यांनी माझ्यावर खोट्या केसेस दाखल करून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला.”

चरण चवरे यांनी ना. एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे आणि आमदार भरतसेठ गोगावले यांच्याशी असलेल्या संबंधांचा स्वार्थासाठी गैरवापर केल्याचा गंभीर आरोपही भोसले यांनी केला. “अधिकाऱ्यांवर दबाव टाकून बदलीसाठी डील केल्या, दमदाटी व गुंडगिरी करून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला. पालखी महामार्गात गेलेल्या अवघ्या तीन गुंठा जमिनीचा मोबदला जवळपास दोन कोटी रुपयांपर्यंत घेतल्याची बाब अत्यंत गंभीर आहे,” असे त्यांनी सांगितले.

भोसले यांनी आणखी आरोप करताना म्हटले की, “मागील विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांचा प्रचार जाणीवपूर्वक केला नाही. केवळ स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी राजू खरेंचा प्रचार करून महायुतीत बिघाड करण्यात आला.” आज शिवसेना सत्तेत असतानाही मूळ, जुन्या शिवसैनिकांवर अन्याय होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

“स्व. बाळासाहेब ठाकरे यांची शिकवण देणारे आयते पुढारी आज पैशाच्या लालसेपोटी पक्षाची बदनामी करत आहेत. हफ्तेखोर जिल्हा प्रमुखामुळे शिवसेनेची जनमानसातील प्रतिमा मलीन झाली आहे,” असा आरोप करत भोसले यांनी पक्षश्रेष्ठींनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि चरण चवरे यांची तात्काळ हकालपट्टी करावी, अशी ठाम मागणी केली.

शेवटी ते म्हणाले, “या मागणीसाठी मी स्वतः जिल्ह्यातील सर्व जुने व नवे शिवसैनिकांचे शिष्टमंडळ घेऊन पक्षप्रमुख व वरिष्ठ नेत्यांना भेटणार आहे. चरण चवरे यांची हकालपट्टी होईपर्यंत आमचा लढा सुरूच राहील.”


Reactions

Post a Comment

0 Comments