शिवसेना महायुतीमधूनच निवडणूक लढणार; १५ पासून इच्छुकांचे अर्ज स्वीकारणार
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना सोमवार, १५ डिसेंबरपासून इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारणार आहे. ही निवडणूक महायुतीमधूनच लढवली जाणार असल्याची माहिती शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. ज्योती वाघमारे आणि जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना जोमाने तयारीला लागली असून, राज्य पातळीवरून स्थानिक पातळीवर महायुती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोलापुरात लोकसभा व विधानसभा निवडणुकांत भाजप उमेदवारांच्या विजयासाठी शिवसेनेने मोलाची भूमिका बजावली आहे. त्यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांनी महापालिका निवडणुकीसाठी शिवसेनेला २५ जागा सोडण्याचे आश्वासन दिले होते. ते आश्वासन पाळले जावे, अशी अपेक्षा जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना डॉ. वाघमारे व शिंदे यांनी सांगितले की, एकूण १०२ जागांसाठी तयारी करण्यात येणार असून, भाजपने दिलेल्या शब्दानुसार शिवसेना ‘बेस्ट’ २५ जागांवर उमेदवार देणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १५ ते १८ डिसेंबर हा कालावधी ठेवण्यात आला असून, या कालावधीत १०२ जागांसाठी अर्ज स्वीकारले जातील.
भाजप, शिवसेना आणि अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची महायुती करूनच सोलापूर महानगरपालिका निवडणूक लढवली जाईल, असेही यावेळी ठामपणे सांगण्यात आले.या पत्रकार परिषदेला जिल्हाप्रमुख अमर पाटील, सचिन चव्हाण, तुकाराम मस्के, जयश्री पवार, मनीषा नलावडे, अश्विनी भोसले, पूजा चव्हाण, माधुरी कांबळे, सुनंदा साळुंखे, सागर शितोळे आदी उपस्थित होते.
0 Comments