शिक्षकांअभावी शाळा बंद पडणार नाहीत!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-इयत्ता नववी व दहावीच्या वर्गांमध्ये २० पेक्षा कमी पटसंख्या असल्यास त्या शाळेतील शिक्षकांना अतिरिक्त ठरवून दुसरीकडे समायोजन करण्याचा निर्णय आता बदलण्याची शक्यता आहे. १५ मार्च २०२४ रोजीच्या संचमान्यतेच्या शासन निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील तब्बल २२ शाळांसह राज्यातील ६०० हून अधिक माध्यमिक शाळा २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात बंद पडण्याची भीती व्यक्त होत होती. या निर्णयाविरोधात शिक्षक व मुख्याध्यापक संघटना आक्रमक झाल्यानंतर आता शासन पातळीवर पटसंख्येच्या निकषात शिथिलता आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांनी दिली आहे.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीची संचमान्यता प्रक्रिया डिसेंबर अखेर पूर्ण होणार आहे. जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिका शाळांची पटसंख्या प्रथम २० डिसेंबरपर्यंत निश्चित होईल. त्यानंतर पुढील दहा दिवसांत खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची पटसंख्या पूर्ण केली जाणार आहे. या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे समायोजन इतर शाळांमध्ये केले जाणार आहे.
शासनाच्या नियोजित प्रक्रियेनुसार, प्रथम त्याच शाळेत, नंतर त्याच तालुक्यात, जिल्ह्यात, त्यानंतर विभागात आणि अखेरीस राज्यभरात कुठेही अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन केले जाणार आहे. मात्र, सध्याच्या नियमांनुसार नववी व दहावीच्या ज्या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे, त्या ठिकाणी संबंधित शिक्षक अतिरिक्त ठरणार आहेत. हाच निर्णय सर्वाधिक वादग्रस्त ठरला आहे.
दरम्यान, समायोजनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होण्यापूर्वी या पटसंख्येच्या अटीत बदल करण्याचा विचार शासन स्तरावर सुरू असून, त्यासंदर्भातील सुधारित शासन निर्णय डिसेंबर अखेरपर्यंत जाहीर होण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे. हा निर्णय प्रत्यक्षात आल्यास अनेक ग्रामीण व दुर्गम भागांतील माध्यमिक शाळा शिक्षकांअभावी बंद पडण्याचा धोका टळणार आहे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
.png)
0 Comments