Hot Posts

6/recent/ticker-posts

महापालिका रणधुमाळीपूर्वी राजकीय संभ्रम

 महापालिका रणधुमाळीपूर्वी राजकीय संभ्रम




युती-आघाड्यांवर निर्णय रखडले; सोलापूरसह राज्यातील सर्वच पक्ष तळ्यात-मळ्यात

सोलापूर (सचिन जाधव):- राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युती व आघाड्यांबाबत स्पष्ट भूमिका जाहीर न झाल्याने सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची स्थिती तळ्यात-मळ्यात झाली आहे. विशेषतः भारतीय जनता पक्षाने प्रत्येक शहरानुसार स्वतंत्रपणे युतीबाबत फेरविचार करण्याचे धोरण स्वीकारल्यामुळे राजकीय समीकरणे अधिकच गुंतागुंतीची बनली आहेत.

नगर परिषदा व महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्यापासून भाजपने युतीविषयी सावध भूमिका घेतली आहे. भाजप आणि शिवसेना यांच्यात युती होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी स्पष्ट केले होते. मात्र, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होऊ शकतात, असे संकेतही त्यांनी दिले होते. दरम्यान, नगर परिषद व नगर पंचायतींच्या निकालांनंतर भाजपची राजकीय ताकद वाढल्याचे चित्र दिसून आल्याने महापालिकांमध्ये युती करताना भाजप अधिक आक्रमक व ताठर भूमिका घेणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगर परिषद व नगर पंचायतींच्या निवडणुकांमध्ये भाजपची कामगिरी भक्कम राहिल्याने महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्याचा आत्मविश्वास भाजपमध्ये वाढला आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, ठाणेप्रमाणेच सोलापूर महापालिकेतही भाजप स्वबळाचा पर्याय गांभीर्याने तपासत असल्याची चर्चा आहे.

 सोलापूर महापालिकेतही अनिश्चिततेचे वातावरण

सोलापूर महापालिकेत भाजप, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि काँग्रेस यांच्यातील संभाव्य युती-आघाड्यांबाबत अजूनही चित्र स्पष्ट झालेले नाही. भाजपकडून स्वतंत्र ताकद आजमावण्याचे संकेत मिळत असून, शिवसेना व राष्ट्रवादीकडूनही पर्यायी समीकरणांची चाचपणी सुरू आहे. यामुळे सोलापूरमधील इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता आहे.

 राष्ट्रवादी व शिवसेनेकडून चाचपणी

महाविकास आघाडी एकत्र न राहिल्यास इतर पर्याय खुले असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून देण्यात आले आहेत. दुसरीकडे, अजित पवार गटही काही शहरांमध्ये स्वबळ तर काही ठिकाणी आघाडीच्या शक्यतांची चाचपणी करीत आहे. याचा परिणाम सोलापूरसह मध्यम शहरांच्या राजकारणावरही होताना दिसत आहे.

कार्यकर्त्यांची कोंडी; ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’

युती-आघाड्यांचा अंतिम निर्णय लांबत असल्याने सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपसह सर्वच पक्षांकडून सध्या इतर पक्षांतील कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याचा सपाटा सुरू आहे. त्यामुळे अनेक वर्षे एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले नेते व कार्यकर्ते एकाच पक्षात दिसत आहेत. यामुळे नाराज झालेले अनेक कार्यकर्ते उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षाचा विचार करत आहेत. मात्र, पक्षाची अंतिम भूमिका काय असेल, याकडे लक्ष ठेवून ते निर्णय रखडवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे ‘कोणता झेंडा घेऊ हाती?’ अशी अवस्था सोलापूरसह सर्वच महापालिकांतील कार्यकर्त्यांची झाली आहे.

उमेदवार याद्या लांबणीवर

आजपासून उमेदवारी अर्ज दाखल होणार असले, तरी युती-आघाड्यांचा अंतिम निर्णय जाहीर न झाल्याने बहुतेक पक्षांनी उमेदवार याद्या जाहीर केलेल्या नाहीत. रविवारनंतरच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता असून, तोपर्यंत सोलापूर महापालिकेसह राज्यातील राजकारणात अनिश्चिततेचे सावट कायम राहणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments