Hot Posts

6/recent/ticker-posts

करूणाशील राज्यस्तरीय पुरस्कारांचे शनिवारी वितरण

 करूणाशील राज्यस्तरीय पुरस्कारांचे शनिवारी वितरण




मानवतेच्या दृष्टीने रुग्णसेवा करणाऱ्या परिचारिकांचा सन्मान

 सोलापूर (कटूसत्य वृत्त):- करुणाशील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे मानवतेच्या दृष्टिकोनातून रुग्णसेवा करणाऱ्या 16 परिचारिका आणि अधिसेविकांना राज्यस्तरीय करुणाशील पुरस्कार  तर दोन जणांना जीवन गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आशुतोष नाटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
           शनिवार, दि. 13 डिसेंबर रोजी 4 :30 वाजता शिंदे चौकातील शिवस्मारक सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे. हा कार्यक्रम शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या हस्ते होणार असून महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलच्या प्रबंधक व अधिक्षिका सुश्रुषा सेवा (मुंबई) अर्चना बढे, सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक प्रा.डॉ. नसीम पठाण, जी.एम. मागासवर्गीय संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
       या कार्यक्रमात नर्स एज्युकेटरच्या सेवानिवृत्त प्राचार्या डॉ. सरोज उपासनी आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ नर्सिंगच्या निवृत्त प्राचार्या डॉ. स्वाती वीरेश्वर कांबळी यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मान होणार आहे. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, बुके आणि भारतीय संविधानाची प्रत असे पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्काराचे यंदा २३ वर्ष आहे. कोरोना काळ वगळता हा पुरस्कार सोहळा अखंड सुरूच आहे. पुढील दोन वर्षात रौप्य महोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम घेण्याचे नियोजन आतापासून सुरू केल्याचेही नाटकर यांनी सांगितले. या  समारंभास नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आशुतोष नाटकर यांनी केले आहे.  
           या पत्रकार परिषदेस शशिकांत पाटील, डॉ. राजीव मोहोळकर, प्रफल्ल सोनवणे आदी उपस्थित होते.

चौकट-
यांचा होणार पुरस्काराने सन्मान

पुरस्कारप्राप्त 16 परिचारिका, अधिसेविका यांचा सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये सुमित्रा गोरे-भाकरे (धाराशिव), गायत्री म्हात्रे (रायगड), संगीता पवार दुबे (पुणे), वैशाली राऊत (मुंबई), मंजुषा तिवारी  (नागपूर), गोदावरी कोकाटे  (मुंबई), विद्या जाधव  (पुणे), दिलशाद उस्मान सय्यद (सोलापूर), जयमाला सामसे (मुंबई), मीना  दैवज्ञ (लातूर), जया जमादार (राज्य कामगार विमा रुग्णालय), विजयमाला बेले  (संभाजीनगर), महेश्वरी तुप्पद (धनराज गिरजी रुग्णालय), वर्षा चौरे (पुणे), सायमन डोलारे (सिव्हील हॉस्पीटल) आदी.

Reactions

Post a Comment

0 Comments