Hot Posts

6/recent/ticker-posts

मोडनिंब एमआयडीसी संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर - रणजितसिंह शिंदे

मोडनिंब एमआयडीसी संदर्भातील तांत्रिक अडचणी दूर - रणजितसिंह शिंदे 

 




माढा (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील मोडनिंब येथे मंजूर असलेल्या एमआयडीसीच्या (MIDC) पुढील प्रत्यक्ष कार्यवाहीमध्ये इको-सेन्सिटिव्ह-झोनची समस्या निर्माण झाली होती.ती समस्या व इतर अडचणी सोडविण्यासाठी शुक्रवारी 12 डिसेंबर रोजी हिवाळी अधिवेशनात नागपूर येथील विधानभवनात राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात सोलापूरचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे,महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव व इतर अधिकारी आणि व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित सोलापूरचे जिल्हाधिकारी डॉ.कुमार आशीर्वाद यांच्या समवेत झालेल्या बैठकीत मोडनिंब एमआयडीसी संदर्भात सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्या असून महसूलमंत्र्यांनी मंजुरी दिल्याने पुढील कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाल्याचा माहिती जिल्हा दूध संघांचे चेअरमन भाजपचे नेते रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे.

मोडनिंब येथील एमआयडीसीच्या संदर्भातील सर्व तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी चेअरमन रणजितसिंह शिंदे व माजी सभापती विक्रमसिंह शिंदे, समाजकल्याणचे माजी सभापती शिवाजी कांबळे, कैलास तोडकरी,विशाल मेहता,संतोष पाटील,चांगदेव वरडे,सुखदेव पवार यांनी महसूलमंत्री व पालकमंत्री यांच्याकडे मागणी केली होती त्यानुसार नागपूर येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत मोडनिंब एमआयडीसीमध्ये इको- सेन्सिटिव्ह-झोनमध्ये केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार मान्यता दिलेले पर्यावरणपूरक उद्योग व इतर क्षेत्रात सर्व प्रकारचे लहान-मोठे उद्योग उभारणी करण्यास मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांनीही ही बाब मान्य करुन तसे लेखी संमत्ती व हमीपत्र शासनाकडे सादर केले होते.या सर्व मुद्द्याच्या अधीन राहून रणजितसिंह शिंदे यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचेसमोर सुस्पष्ट व मुद्देसूद विश्लेषण करून एमआयडीसी या भागातच उभारण्याचे महत्त्व व फायदे विशद केले.यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही मोडनिंब एमआयडीसीच्या अडचणी दूर करुन प्रत्यक्ष कार्यवाही करण्यासाठी आग्रही भूमिका मांडली.या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोडनिंब येथे एमआयडीसीची कार्यवाही होण्यासाठी संमती दिली आहे.त्यामुळे या भागातील ग्रामस्थ,शेतकरी,व्यापारी व स्थानिक नेतेमंडळी यांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीची पूर्तता होणार असल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे.

-चौकट -राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या मंजुरीमुळे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने मोडनिंब येथील 280.67 एकर व मौजे सोलंकरवाडी येथील 63.47 एकर अशा एकूण 344 एकर क्षेत्रातील इको-सेन्सिटिव्ह- झोनमध्ये पर्यावरणपूरक उद्योग व इतरत्र सर्व प्रकारचे उद्योग उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.मोडनिंब हे ठिकाण नॅशनल हायवे व ब्रॉडगेज रेल्वे लाईनने जोडलेले आहे त्यामुळे या भागात औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने मतदारसंघाच्या विकासाला मदत व गती मिळत आहे.माढा तालुका व मतदारसंघातील शेकडों सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे.या भागात लहान-मोठ्या उद्योगांची उभारणी झाल्यावर तालुक्याची अर्थव्यवस्था भक्कम व मजबूत होण्यास मदत होणार असल्याचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी सांगितले आहे.

या बैठकीस पालकमंत्री जयकुमार गोरे,महसूल विभागाचे उपसचिव अजित देशमुख,अव्वर सचिव मोहसीन खान,वनविभागाचे अधिकारी, महसूल मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल गांगुर्डे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments