काँग्रेसमधील घरभेद्यांमुळे मी अनेक निवडणुका जिंकल्यात- आ. देशमुख - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 24, 2025

काँग्रेसमधील घरभेद्यांमुळे मी अनेक निवडणुका जिंकल्यात- आ. देशमुख

 काँग्रेसमधील घरभेद्यांमुळे मी अनेक निवडणुका जिंकल्यात- आ. देशमुख




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- काँग्रेस पक्षामधील घरभेद्यांमुळे मी अनेक निवडणुका जिंकल्या आहेत. उमेदवारी जाहीर झाल्यावर बाहेरून आलेले स्वभावाप्रमाणे घरभेदी होतील. दगा देणारा साप स्वभाव कधीही सोडत नाही. त्यांच्यापासून दूर राहा. मोहिते-पाटील भाजपमध्ये आले, तेव्हाही खूप त्रास दिला गेला, सध्याचा त्रास त्यापुढे काही नाही, त्यामुळे हेही दिवस जातील, शांत राहा, असा सल्ला सोलापूर दक्षिणचे भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी कार्यकर्त्यांना दिला.

सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा निर्धार मेळावा शहरातील राजस्व नगरमध्ये झाला. त्या मेळाव्यात आमदार सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी भाजपमधील इनकमिंगवर प्रहार केला. कडाडून विरोध करूनही माजी आमदार दिलीप माने यांचा नुकताच भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. त्यावरून सुभाष देशमुखांनी नाराजी व्यक्त करताना नाव न घेता अनेक टोले लगावले.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तिकिट देताना तो कार्यकर्ता भाजपच्या (BJP) परंपरेतील असावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली. त्यावर बोलताना 'जनता जागरूक आहे; नेत्यांनी दिवसा एक आणि रात्री एक करू नये, ते फार दिवस टिकणार नाही. तसेच, बाहेरून आलेल्या घरभेद्यांपासून सावध राहा, असे आवाहनही आमदार देशमुख यांनी केले.

आमदार देशमुख म्हणाले, नेते एकीकडे असले तरी जनता जागृत आहे, हे नगरपालिका निवडणुकीत दिसले आहे. पंधरा जागा मिळणार म्हणणाऱ्यांना भाजप समजला नाही. त्यांच्या अपप्रचारावर विश्‍वास ठेवू नका. निवडणुका झाल्यावर त्यांना आपण स्वतः पक्ष कार्यालयात घेऊन येऊ. मी कधीही गावांत भांडणे लावली नाहीत. लोक गुण्यागोविंदाने राहावेत, यासाठी प्रयत्न केले आहेत.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत त्यांच्या बोगस सोसायट्या असतानाही आपल्या पॅनेलला ४८० मते मिळाली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत उमेदवारी मिळालेल्यांनी इतरांची नाराजी दूर करावी, असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले.

शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या, असुरक्षित न वाटून घेऊ नका, कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. चलबिचल होऊ नका, कोणी येवो-जावो निष्ठावंतांनाच, सामाजिक कार्य करणारे आणि घरात घेण्याच्या लायकीचा उमेदवार आगामी निवडणुकीत देणार आहे, अशी ग्वाही शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर यांनी दिली.

निष्क्रीय नगरसेवकांना उमेदवारी देणार नाही. घाबरू नका, कोणीही आले गेले तरी निष्ठावंतांना उमेदवारी मिळेल. दुसऱ्या प्रभागात संधी दिली तरी लढा, पक्षादेश पाळा, अशी सूचनाही शहराध्यक्षांनी कार्यकर्त्यांना केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages