सोलापूर(कटूसत्य वृत्त):- महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने काढलेल्या फेरआरक्षण सोडतीवर राज्य निवडणूक आयोगाने अखेर शिक्कामोर्तब केले आहे.
११ आणि १७ नोव्हेंबर रोजी काढलेल्या आरक्षणाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आले होते. आलेल्या सर्व हरकतींवर निर्णय घेऊन त्याचा सविस्तर अहवाल आणि फेरआरक्षण सोडत प्रक्रिया अंतिम करून महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी निवडणूक आयोगाकडे पाठविले होते. ही आरक्षण सोडत राज्य निवडणूक आयोगाने अंतिम करून ती राजपत्रात निवडणुकीच्या कार्यक्रमात ठरल्या पध्दतीने मंगळवारी रात्री प्रसिध्द करण्यात आली.
आयोगाने ठरवून दिलेल्या कार्यक्रमानुसार महापालिका प्रशासनाने १०२ जागा असलेल्या २६ प्रभागांतील आरक्षण सोडत प्रथम ११ नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. यानंतर मात्र आयोगाने आखून दिल्याप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात न आल्याने पुन्हा एकदा १७ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढून ती आयोगाकडे पाठविण्यात आली होती. यामध्ये २६ प्रभागांतील १०२ जागांवर १५ अनुसूचित जाती त्यामध्ये ८ महिला, अनुसूचित जमाती २ त्यामध्ये १ महिला, नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) २७ त्यामध्ये महिला १४ आणि सर्वसाधारण ५८ त्यामध्ये २८ महिला अशा १०२ जागांमध्ये ५१ महिला असे आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीवर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या होत्या.
या दरम्यान, प्रभाग २ ब आणि २४ क मधून रिवाज अहमद मोमीन यांनी हरकत नोंदविली होती. प्रभाग २४
मधून भाजपचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे, राम वाकसे यांनी फेरआरक्षण सोडत प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी हरकत घेतली होती. त्याचबरोबर राजू चव्हाण यांनीही हरकत नोंदविली होती. सर्वसाधारण महिला
अर्चना दुलंगे यांनी फेरआरक्षण सोडतीमुळे ६० टक्के महिला आरक्षणाच्या जागेवरील संख्यात्मक विसंगती झाल्याने आरक्षण सोडत रद्द करून मूळ प्रारूप आरक्षण सोडत पूर्ववत ठेवण्यात यावी, असे अपील दाखल केले होते. तर प्रभाग २४ व सर्वसाधारण महिला येथून डॉ. बसवराज बगले यांनीही अपील दाखल केले होते. या सर्व हरकती अपील आणि सूचना महापालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार फेटाळून लावले आहे. यामुळे आता महापालिका प्रशासनाने २७ नोव्हेंबर रोजी काढलेल्या फेरआरक्षण सोडती या निश्चित झाल्या आहेत.
.jpg)
0 Comments