Hot Posts

6/recent/ticker-posts

भरधाव सिमेंट मिक्सरची दुचाकीस धडक; ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

 भरधाव सिमेंट मिक्सरची दुचाकीस धडक; ज्येष्ठ महिलेचा मृत्यू





टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- टेंभुर्णी शहरात रस्त्यावरील अतिक्रमण आणि टेंभुर्णी ट्रॅफिक पोलिसांच्या दुर्लक्षामुळे बेशिस्त वाहतुकीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सातत्याने बसत असून, त्याचा भयावह प्रत्यय मंगळवारी सायंकाळी आला. करमाळा चौकात भरधाव वेगाने आलेल्या पिवळ्या रंगाच्या सिमेंट मिक्सरने पाठीमागून दुचाकीस जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील ज्येष्ठ महिलेचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला, तर त्यांचे पती किरकोळ जखमी झाले.

या अपघातात लंकाबाई ज्ञानदेव गदादे (वय ५७, रा. बिजवडी रोड, इंदापूर) यांचा मृत्यू झाला असून, त्यांचे पती ज्ञानदेव गदादे (वय ६०) हे जखमी झाले आहेत.

ज्ञानदेव व लंकाबाई गदादे हे त्यांच्या यामाहा दुचाकीवरून (क्र. एमएच-४२-आर-८००७) पत्नीच्या भाचीस भेटण्यासाठी माढा तालुक्यातील वेणेगाव येथे गेले होते. त्यानंतर टेंभुर्णी येथील कुटे वस्तीवर लंकाबाई यांच्या बहिणीला भेटून ते इंदापूरकडे परतत असताना सायंकाळी सुमारे पाच वाजता करमाळा चौकात हा अपघात झाला.

पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या सिमेंट मिक्सरने दुचाकीस जोरात धडक दिली. धडकेनंतर लंकाबाई गदादे यांच्या पायावरून मिक्सरचे चाक गेल्याने त्यांचा पाय अक्षरशः चेंदामेंदा झाला. त्या रस्त्यावर जोरात आदळून गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने अकलूज येथे उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पतीस बाजूला पडल्याने किरकोळ जखमा झाल्या आहेत.

दरम्यान, टेंभुर्णी शहर हे अनेक महामार्गांनी जोडलेले असल्याने येथे दुचाकी, चारचाकी, मालट्रक, कंटेनर, सिमेंट बल्कर, अवजड वाहने, शाळेची वाहने तसेच सध्या उसाचे कारखाने चालू झाल्यामुळे ऊस वाहतुकीच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. मात्र, टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे ट्राफिक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याने वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन, भरधाव वेग, उलट दिशेने वाहने चालविणे, रस्त्यावरील अतिक्रमण व चढ्या-उतार ठिकाणी उभ्या असलेल्या वाहनांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. लहान मुले व वृद्धांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते.

करमाळा चौकात स्पीड ब्रेकरचा अभाव, नियमित वाहतूक पोलिसांची नेमणूक नसणे आणि अतिक्रमणांवर कारवाई न होणे यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. या घटनेनंतर टेंभुर्णी शहरातील बेशिस्त वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments