सलग सुट्ट्यांत अक्कलकोटमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- सलग सुट्ट्यांमुळे अक्कलकोटमध्ये पुणे, मुंबईसह देश-विदेशातून भाविक आलेले होते. त्या प्रसंगी सर्व प्राप्त परिस्थितीचा विचार करून न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली अन्नछत्र मंडळाकडून येणाऱ्या भाविकांसाठी उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते. भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी येथील कर्मचारींनी भाविकांचे हित जपले.भाविकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी येथील कर्मचारी व सेवेकरी रात्रंदिवस धडपडत आहेत. न्यासाकडून अन्नदानाची वेळ वाढविली होती.
सलग सुट्ट्यांमुळे श्रीक्षेत्र अक्कलकोट येथील स्वामी समर्थाच्या दर्शन व महाप्रसाद घेण्यासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात गेल्या १० दिवसात १२ लाखांहून अधिक भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे. सरत्या वर्षी भाविकांच्या गर्दीने उच्चांक गाठला आहे.
शेकडो भक्तांनी केले रक्तदान :
सलग सुट्ट्यांमध्ये सोलापूर येथील विविध रक्तपेढीने अन्नछत्र मंडळात आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये शेकडो स्वामी भक्तांनी रक्तदान केले.
चोख बंदोबस्त :
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावर यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक दिपक भिताडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त मंदिर व न्यासाच्या परिसरात लावण्यात आला होता.
न्यासाचे नेटके नियोजन :
बाहेर गावामधून आलेल्या वाहनांची मैंदर्गी, बसलेगाव, व शहरातील मुख्य रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होत होती. हे लक्षात घेऊन न्यासाच्या मैंदर्गी रस्त्यावरील गेटने भाविकांना बाहेर जाण्यासाठी रस्ता मोकळा करण्यात आल्यामुळे वाहनांची गर्दी कमी झाली. न्यासाने पार्किंगची व्यवस्था चोख केलेली होती. नेहमीच भक्तांना सुविधा देण्यामध्ये न्यास हे अव्वल असून भक्तांना कोणत्याच अडचणी येता कामा नये आशा उपाययोजना व दक्षता घेत असल्याने भक्तांना सुखकर पद्दतीने महाप्रसादाचा लाभ मिळाला.
लाखो भाविकांनी घेतला महाप्रसादाचा लाभ :
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात दैनंदिन दोन्ही वेळेस मोफत महाप्रसादाची सोय, भक्तांच्या यथाशक्तीच्या देणगीवर सुरू आहे. दररोज २५ हजार हून अधिक तर सण, वार, उत्सव, दर गुरूवारी, संकष्टी चतुर्थी, एकादशी, गुरुपोर्णिमा व सलग सुट्ट्या असल्याच्या दिवशी १ लाखाहून अधिक भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.
श्री क्षेत्र अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे नांव सातासमुद्रापार :
सलग सुट्ट्यांच्या काळात महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, गोवा, मध्यप्रदेश, केरळ, तमिळनाडू, गुजरात, दिवदमन, उत्तराखंड, काश्मीर पंडित व दिल्ली याबरोबरच राजस्थान, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यासह विदेशातून लाखो भाविकांनी श्रीक्षेत्र अक्कलकोट येथे येऊन श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाबरोबरच अन्नछत्र मंडळात महाप्रसादाचा लाभ घेतेले.
नव्याने बांधण्यात येणाऱ्या महप्रसादगृहाचे काम प्रगतीपथावर:
सन २०२४ च्या गुरुपौर्णिमेला महाप्रसादगृहाच्या बांधकामास प्रारंभ करण्यात आलेला होता. नियोजित महाप्रसाद गृहाची इमारत, भव्य आणि मंदिर सदृश्य असणार आहे. ही इमारत पूर्णपणे वातानुकुलित असून या इमारतीचे बांधकाम क्षेत्र १ लाख १९,३९८ चौरस फुट असणार आहे. इमारतीच्या टेरेसवर श्री स्वामी समर्थांची ५१ फुटांची सुंदर, रेखीव आणि भव्य मुर्ती, सर्वांचे लक्ष वेधून घेईल. या नवीन नियोजित महप्रसादगृहात २५०० भाविकांची महाप्रसादाची व्यवस्था असून, या आराखड्याच्या माध्यमातून हे पाहू शकता की, एकूण ५ हजार भाविकांसाठी बसून सर्व सोयी सुविधांनी युक्त अशा प्रतिक्षा कक्षाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय या इमारतीच्या तळघरामधे धान्य- भाजीपाला कोठार, चटणी व पिठाची गिरणी तसेच १ तासामध्ये ८०० चपाती तयार करता येणाऱ्या ७ मशिन्स, आणि भांडे धुण्यासाठी डिश वॉशर यांची देखील सोय आहे. संपूर्ण इमारतीमध्ये अग्निशामन यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सदर इमारतीचे बांधकाम करण्याची पुर्वतयारी झाली असुन, ही सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सुसज्ज व प्रशस्त इमारत, स्वामी भक्तांच्या देणगीतून साकार होणार आहे. या बांधकामाचा सर्वसाधारण अंदाजे खर्च रुपये ६० कोटी, इतका अपेक्षित आहे. श्री क्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारी सदरची वास्तू असणार आहे.
चौकट:
विविध समाजाभिमुक योजना उल्लेखनीय:
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली समर्थ महाप्रसाद सेवा व कुस्तीगिरांसाठी खुराक या सह विविध योजना उल्लेखनीय रित्या राबविले जात आहेत.

0 Comments